हणमंतराव गायकवाड उलगडणार रोजगार संधीचा खजिना

हणमंतराव गायकवाड उलगडणार रोजगार संधीचा खजिना

सांगली - मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि त्या बळावर महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर वन ठरलेल्या दैनिक ‘सकाळ’च्या सांगली विभागीय कार्यालयाचा ३४ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. २४) साजरा होतोय. यानिमित्ताने भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे ‘नव्या युगातील रोजगाराच्या संधी’ या विषयावरील व्याख्यान समस्त सांगलीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत हा सोहळा 
रंगणार आहे. 

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सांगलीकरांचा वाटाड्या राहिलेला ‘सकाळ’ या निमित्ताने ‘उद्याची सांगली’ या विषयावरील विशेषांक वाचकांसाठी घेऊन येत आहे. 

सहा गल्ल्यांची सांगली विस्तारत सांगली, मिरज, कुपवाड महापालिका झाली. निसर्गाची कृपा असलेल्या शिराळा तालुक्‍यापासून ते दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जत-आटपाडीपर्यंत या जिल्ह्याचा पसारा. अनेक प्रश्‍नांची उकल करत, माळावर प्रयत्नाने बाग फुलवत, कधी दुष्काळाचे तर कधी महापुराचे आव्हान परतवून लावत जिल्हा विकासाच्या वाटेवर धावतोय. या प्रवासात ‘सकाळ’ने सांगलीकरांना दिशा देण्याचे काम केले आहे. गेल्या ३४ वर्षांच्या प्रवासात विश्‍वासार्ह दैनिक म्हणून मोहोर उमटवली आहे. केवळ प्रश्‍न मांडून न थांबता त्याची उकल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

चांगल्याला चांगले म्हणत पाठीवर कौतुकाची थाप टाकताना, त्यांना बळ देताना ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी’ या संत वचनाप्रमाणे ‘सकाळ’ने अपप्रवृत्तींविरुद्ध ठाम भूमिका घेतल्या आहेत. त्याच परंपरेला साजेसा आणि दिशादर्शक असा ‘उद्याची सांगली’ हा विशेषांक भविष्यातील जिल्ह्याची दिशा कशी असावी, नव्याने नगरपंचायती झालेल्या छोट्या शहरांची दिशा कशी असावी, याचा वेध घेणारा आहे. त्यात मान्यवर लेखकांसह सांगलीकरांनीच भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला आहे. 

चला भेटू, नोकरी देणाऱ्या माणसाला
‘सकाळ’चा वर्धापन दिन आणि व्याख्यान हे नवे समीकरण आता रुजले आहे. यावर्षी बीव्हीजी ग्रुपचे संचालक श्री. हणमंतराव गायकवाड हे मुख्य वक्ते म्हणून लाभले आहेत. केवळ आठ कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेला या कंपनीचा प्रवास आजघडीला ८५ हजार कर्मचाऱ्यांवर पोहोचला आहे. देशातील २० राज्यांतील प्रमुख शहरांमध्ये सेवा देणारी कंपनी आता आशिया खंडातील सर्वात मोठी ठरली आहे. या कंपनीचे मुख्य विश्‍वस्त-संचालक श्री. गायकवाड आहेत. स्वच्छता, आरोग्य, आपत्कालीन सेवा, शेती अशा विविध क्षेत्रांत सेवा पुरवणारी कंपनी म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. संकट काळात आठवणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेची सेवा हीच कंपनी चालविते.

लोकसभा, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय असा दिल्लीतील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतेची जबाबदारी पेलते. तिसरी इयत्ता शिकलेल्या माणसापासून ते आयआयएमची पदवी असलेला इथला प्रत्येक कर्मचारी कंपनीचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे, टाटा समूह, हिंदुस्थान लिव्हर, फोक्‍सवॅगन असे सातशेंहून अधिक मोठे ब्रॅंड असलेल्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. या यशोगाथेच्या नायकाचा प्रवास सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर गावातील सामान्य कुटुंबातून झाला. अशा अवलियाचे विचार ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com