मिरजेतील सावकार महिला रडारवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सांगली - मिरज येथील नवविवाहित दांपत्याच्या आत्महत्येला कारणीभूत खासगी सावकार महिलेस कुणी पाठीशी घालत असतील तर मी जातीने त्यात लक्ष घातले आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती मी तत्काळ मागवली आहे, असे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तातील मुद्यांचा उल्लेख करीत त्यांनी या कार्यवाहीची माहिती दिली. 

अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत खून करून मृतदेह जाळण्याची धक्कादायक घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने ‘राजकारणी कोमात, पोलिस-प्रशासन दिशाहीन’ हे विश्‍लेषण प्रसिद्ध केले होते. त्यात जिल्हा प्रशासनाच्या काही चुकांवर बोट ठेवण्यात आले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.

मिरजेतील अभिजित पाटील आणि त्यांच्या पत्नीने सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. झारीबाग परिसरातील एका खासगी सावकार महिलेसह जयसिंगपूर येथील दोन सावकारांकडून त्यांना त्रास दिला जात होता, अशी माहिती पुढे येतेय. मात्र, पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मिरजेतील खासगी सावकाराच्या प्रकरणात मी लक्ष घातले आहे. त्याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून कुणाला वाचविले जाणार नाही, याची काळजी नक्कीच घेऊ.’’

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलनासाठी जागा देण्याबाबतचा मुद्दाही उपस्थित केला होता. त्याबद्दल ते म्हणाले, ‘‘त्याबाबत चर्चा सुरू आहे. कार्यालयाच्या उत्तरेकडील जागा मिळाली तर ठीक अन्यथा पर्यायी जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

वजनकाटे अडचण...
साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीची साखर आयुक्तांनी सूचना दिली असली तरी वजन-मापे विभागाच्या संचालकांनी तसे आदेश दिल्याशिवाय कार्यवाही होत नाही. तरीही, मी इथल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तपासणी करून घेणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

लोहानाकडे दुर्लक्ष नको
अनिकेत कोथळे प्रकरणात गिरीश लोहाना या व्यक्तीचे नाव सतत पुढे येत आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, अशा सूचना मी पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sangli News Vijaykumar Kalam Press