महाविद्यालयीन प्रवेशावेळीच होणार मतदार नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

शासनाचा निर्णय - तरुण मतदार नोंदणी होण्यासाठी प्रयत्न - महाविद्यालयांना सूचना 

सांगली - नवीन पिढीची मतदार नोंदणी सुलभ करण्यासाठी शासनाने महाविद्यालयीन प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शासनाने निर्णय घेतला असून तो यंदापासून अमलात आणण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबरोबरच मतदार नोंदणीचेही काम करावे लागणार आहे.

शासन दरवर्षी एक जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांचे मतदार नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करते. तसेच मतदार याद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमही आयोजित करते. यातून नवीन मतदार नोंदणी बरोबरच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असतो. मात्र तरीही यादीत नावे नसणे किंवा त्रुटी असण्याच्या तक्रारी वारंवार येत  राहतात. त्यामुळे निवडणूक आयोगानेच महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचा फॉर्म भरून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

साधारणपणे बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी १८ वर्षे पूर्ण केलेली असतात. हे विद्यार्थी महाविद्यालय, विद्यापीठ तसेच तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. या मुले, मुलींची मतदार नोंदणी सोपी होण्यासाठी ठोस व्यवस्था करण्याची गरज होती. ती महाविद्यालय प्रवेशावेळीच नोंदणी करण्यामुळे पूर्ण होणार आहे. त्यासाठी शासनाने तसा निर्णय घेतला आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आदींना प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जामध्येच मतदार नोंदणीचे हमीपत्र घेण्याची सूचना केली आहे. यामध्ये एक जानेवारीस मी अठरा वर्षे पूर्ण केली आहे किंवा करणार आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्याबरोबर  माझे नाव मतदार यादीत नोंदवून घेणार आहे. यासाठी नमुना क्र. ६,७,८ व ८ अ हे फॉर्म भरून देत आहे, असे प्रतिज्ञापत्र असणार आहे. मतदार नोंदणीच्या या  कामासाठी प्रत्येक महाविद्यालयास एका प्राध्यापकास नोडल अधिकारी म्हणून नेमण्याची सूचना केली आहे.

महाविद्यालयातील नोडल अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणी, मतदार यादी दुरुस्तीचे नमुना क्रमांक ६, ७, ८ व ८अ चे अर्ज भरून घेऊन ते जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपवायचे आहेत. या अर्जांवर जिल्हा निवडणूक अधिकारी पुढील कार्यवाही करून मतदार यादीत तशी दुरुस्ती करतील. या विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्रे देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मतदार जागृती अभियानासाठी साहित्य पुरवण्यात येणार आहे.

Web Title: sangli news voter registration at college admission