योद्ध्या...संसाररथाचे चाक फिरवणाऱ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

जीवनाच्या विविध क्षेत्रांत स्त्रियांची गगनभरारीची असंख्ये उदाहरणे आपल्या सभोवती दररोज समोर येत असतात. या साऱ्या अर्धांगिनींनी जणू आता पूर्ण संसार व्यापला आहे. असतील तिथे त्या पाय रोवून उभ्या आहेत. जात, धर्म, गावगाडा, रीतीरिवाज, परंपरांची बंधने झुगारून छोट्या छोट्या कृतीतून त्यांनी केलेली मूकक्रांती एरवी आपल्या लक्षातही न येणारी. आज महिलादिनी त्यांच्या या मूकक्रांतीची प्रातिनिधिक ठरावीत अशी काही उदाहरणे. वेगळ्या वाटांचा अवकाश शोधणाऱ्या या साऱ्या जणींच्या कार्यकर्तृत्वाविषयी...  

पंक्‍चरच्या शिकलगारीने संसाराला हातभार 
विजापूर - गुहागर महामार्गावर श्री रेवणसिद्ध देवाचे तीर्थक्षेत्र रेणावी गाव.  येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर आपली गाडी पंक्‍चर झाली तर तुमच्या मदतीला इमताजभाभी सदैव तत्पर असतील. दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्‍टरच्या चाकांचे पंक्‍चर काढून देणाऱ्या या भाभी सर्वांच्या परिचयाच्या. पंक्‍चर झालेच तर पूर्वी खानापूर अथवा विट्याला जाण्याशिवाय पर्याय नसायचा. पती अजमुद्दीन शिकलगार यांना मदत म्हणून त्यांनी सुरुवातीला पंक्‍चर काढण्याचे काम सुरू केले. ते शिकताना त्यांनी सुरुवातीला दोन-चार ट्यूब बादही केल्या. मात्र, त्यांनी हार मानली नाही. आता पती फॅब्रिकेशनचा, तर भाभी पंक्‍चर विभाग सांभाळतात. सन २०१३ मध्ये बचत गटाचे कर्ज काढून पंक्‍चर काढण्यासाठी आवश्‍यक सामुग्री म्हणजे हवेचा इलेक्‍ट्रॉनिक्‍स पंप व उपकरणे खरेदी केली. त्या जेव्हा रात्री-अपरात्री वाहनधारकाच्या मदतीला धावतात, तेव्हा महिला आहोत असा कोणताही अविर्भाव त्यांच्या ठायी नसतो. त्यातून त्यांनी घरखर्च सांभाळला. त्यातून मिळालेल्या पैशातून एक मोटारसायकल आणि जनरेटर खरेदी केला आहे.

रापीने सावरला संसार 
गावगाड्यातल्या चर्मकार समाजाच्या व्यथा क्‍लेषदायकच. अशोक व्हटकर यांचं ‘मेलेलं पाणी’ या व्यथांचं प्रातिनिधिक आत्मकथनच. आता हा व्यवसायक बलुतेदारीच्या चौकटीतून बाहेर पडून कंपन्यांच्या हाती गेलेला. अशा काळात चर्मकार समाजातील एक महिला उंबरठा ओलांडून तासगावसारख्या शहरात येते आणि त्यावर आपल्या कुटुंबांचा चरितार्थ पेलते. तोही अगदी गेल्या चार दशकांपासून. हे उदाहरण आहे लक्ष्मीबाई विठोबा क्षीरसागर यांचे. पासष्ठीला पोचलेल्या लक्ष्मीबाई आजही डोईवरचा जाड भिंगाचा चष्मा सांभाळत तासगाव बसस्थानकाच्या कोपऱ्यात चप्पल दुरुस्तीचे काम करीत असतात. कपाळावर ठसठशीत कुंकू ल्यालेल्या लक्ष्मीबाईंनी आपला व्यवसाय निष्ठेने केला. तसे हे काम पुरुषांच्या मक्तेदारीचे. मात्र, ढासळलेला संसार पेलण्यासाठी त्यांनी हाती रापी घेतली. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता त्यांची जगण्याची ही धडपड ताठ कण्याने सुरू आहे. माहेरी जतला सातव्या वर्षांपासून वडिलांना चप्पल दुरुस्तीच्या कामात त्या मदत करायच्या. लग्नानंतर त्या पुणदीला आल्या. उपजीविकेसाठी गाव सोडले. तासगावात झोपडी थाटली. शेळीपालनातून संसाराचा गाडा पुढे जात नव्हता, त्यामुळे अंगी असलेल्या कौशल्यातून जगण्यासाठी त्या सरसावल्या. नाना बऱ्या वाईट अनुभवांचा सामना करीत त्या संघर्षरत आहेत. दोन मुली लग्न करून सासरी गेल्या. मुलाची पोलिस भरतीसाठी धडपड सुरू आहे. कोणत्याही शासन योजनांची मदत न घेता त्यांनी हक्काचे घर बांधलेय. संघर्ष अभी बाकी है....!

चारचाकीने हाकला संसाराचा गाडा 

वाळव्याच्या पेठ भागातील हर्षदा विजय गायकवाड यांची ही धडपड महिलांसाठी प्रेरणादायी. मायानगरी मुंबईत शिक्षण. लग्नानंतर त्या क्रांतिभूमी वाळव्यात आल्या. माहेर-सासरची परिस्थिती यथातथाच. त्यांचे पती मालवाहतुकीची वाहने चालवायचे. त्यांनी पुढे विद्यार्थी वाहतूक सुरू केली. हा व्याप वाढल्यावर पतीच्या मदतीला त्या धावल्या. दुसरा चालक नेमायचा तर  मासिक सहा हजार रुपये पगार द्यावा लागणार. खर्चात बचत हीच मिळगत, या सूत्राप्रमाणे त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून या व्यवसायात आल्या. आधी चारचाकी वाहन परवाना रितसर मिळवला आणि गावातील पहिल्या महिला स्कूलबस चालक ठरल्या. गावच्या सभोवती असलेल्या मळी भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांची सेवा आता गरजेची झाली आहे. सुरुवातीला महिला व्यावसायिक वाहन चालवताना पाहून लोकांना आश्‍चर्य वाटायचे. मात्र, आता सवयीचे झाले आहे. एका मुलीवर कुटुंब नियोजन आणि तिला उच्चशिक्षण द्यायचा त्यांचा संकल्प आहे. 

फळ विक्रीतून पेलला संसार
 शिराळ्याच्या एसटी स्थानकावरील गंगूबाई पवार यांचा फळ विक्रीचा स्टॉल पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या परिचयाचा. शिक्षण इयत्ता चौथी. पदरी तीन मुली. पवारवाडीच्या विजय यांच्याशी त्यांचा विवाह झाला. डोंगरातील घरची शेती. त्या शेतीतून उदरनिर्वाह अवघड हे त्यांनी खूप लवकर ओळखलं आणि समाज काय म्हणेल याची भीती न बाळगता घराचा उंबरठा ओलांडला. शिराळा येथे बसस्थानकाजवळ फळ व्यवसाय सुरू केला. चिकाटी, कष्टाच्या बळावर त्यांनी या व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे. व्यवसायाचा व्याप इतका वाढवला आहे की, आता त्यांच्याकडे सहा पुरुष कामगार आहेत. स्थानकावरील स्टॉलप्रमाणेच पंचक्रोशीतील आठवडा बाजारातही त्यांचे स्टॉल्स असतात. यात्रांच्या काळात नऊ दिवस चालणाऱ्या गोरक्षनाथ यात्रेत व नागपंचमी यात्रेत त्यांनी तात्पुरते हॉटेल थाटलेले असते. त्या काळात दहा ते पंधरा कामगारांना त्या रोजगार देतात. यात्रा काळात त्यांची धावपळ थक्क करणारी असते. या काळात त्यांचा दिवस २० तासांचा असतो. त्या अल्पशिक्षित; मात्र आपल्या तीनही मुलींच्या शिक्षणात खंड पडू दिलेला नाही. प्राजक्ता, स्नेहल व रामेश्वरी या तिघीही आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यातल्या एकीची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. जगाच्या विद्यापीठात त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्यातून त्यांनी आपले कुटुंब सावरलेच नाही, तर पुढे नेले. 

चायनीजच्या चवीने तारला संसार

सांगलीतील जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील एलआयसी कार्यालयाशेजारील बावर्ची चायनीज सांगलीकरांच्या परिचयाचे आहे. गेली अठरा वर्षे या हॉटेलची धुरा शिल्पा फडके सांभाळतात. आपल्या प्रवासाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘पदवी पूर्ण झाल्यानंतर करायचं काय? हा प्रश्‍न निर्माण झाला. मग नोकरी की व्यवसाय या द्विधा अवस्थेत एक-ना अनेक कल्पना डोक्‍यात येऊ लागल्या. त्यातूनच आम्हा भावंडांच्या डोक्‍यात व्यवसायाला प्राधान्य देत चायनीज हॉटेल सुरू करायचा निर्णय घेतला. त्यावेळी चायनीज पदार्थांची नुकतीच क्रेझ स्थिरावत होती. १९९९ मध्ये मी मुंबईत यासाठीचा एक कोर्स पूर्ण केला. त्यानंतर फक्त चायनीज हॉटेल सुरू केले. हळूहळू जम बसू लागला. किंतू-परंतु न ठेवता कामगारांसोबत आम्ही किचन सांभाळले. चिकण तंदुरी, व्हेज मंच्युरियन, व्हेज भेळ आदी पदार्थांची सांगलीकरांना चव दाखवली आणि रुजवली. दरम्यानच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझा आधारवड भाऊ अचानक काविळीने देवाघरी निघून गेला. कुटुंबाचा सारा भार एकटीवर आला. या दुःखातून कुटुंबाला सावरत आम्ही पुन्हा जम बसवला. गेली अठरा वर्षे आम्ही बावर्ची चायनीज चालवताना सांगलीकर खवय्यांशी नाते जोडले आहे. गरज ओळखून व्यावसायिक बदल केले. आता वीस रुपयांत नाष्टा, तर तीस रुपयांत जेवण ही थिम घेऊन आम्ही नवी सेवा देऊ केली आहे. आमचे अनेक ग्राहक परगावी गेले तरी सुटीत आले की आवर्जून भेट देतात, हीच आमच्या चवीची पोहोच आहे.’’

 

Web Title: Sangli News world womens day special story