esakal | अनोख्या  नृत्य संगीत मैफलीने सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli people mesmerized by the unique dance music concert

तब्बल दहा महिन्याच्या विश्रांतीनंतर सांगलीकर रसिकांना अनोख्या संगीत मेजवानीचा आस्वाद मिळाला.

अनोख्या  नृत्य संगीत मैफलीने सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : तब्बल दहा महिन्याच्या विश्रांतीनंतर सांगलीकर रसिकांना अनोख्या संगीत मेजवानीचा आस्वाद मिळाला. नामवंत गायक, वादक कलाकारांच्या संगतीने रविवारची संगीत मैफल चांगलीच रंगली. "मेलोडिक रिदम' या अनोख्या संगीताविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. आज पंडित भीमसेन जोशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना अनोखी संगीत आदरांजली वाहण्यात आली.

स्वरवसंत ट्रस्टच्यावतीने आयोजित सातवा "भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव' भावे नाट्यमंदिर रसिकांनी फुलून गेले होते. आमदार सुधीर गाडगीळ, डॉ. डी. जे. आरवाडे, गुरूनाथ कोटणीस महाराज, मिलिंद गाडगीळ, डॉ.अभिजीत जोशी, दीपक केळकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन व पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वागत केले. आदरणीय केळकर महाराज आणि कोविडने मृत सर्वांना श्रद्धांजली वाहिली. यंदाचा पंडित वसंत नाथबुवा गुरव संवादिनी वादक पुरस्कार सांगलीचे ज्येष्ठ गुरू विकास जोशी यांना प्रदान करण्यात आला. 

यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या "मेलोडिक रिदम' ची रसिकांना मोठी उत्सुकता होती. त्यामुळे रसिकांची गर्दी होती. पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून गीत-वाद्य-नृत्य असा त्रिवेणी संगीत संगमाचा अनुभव रसिकांना घेता आला. बागेश्री राग व तीनताल एकत्र सादर करण्यात आला. "जो भजे हरी को सदा' या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. पंडित घाटे यांचे तबलावादन, मिलिंद कुलकर्णी यांचे हार्मोनियम, शाकीर खान यांचे सितारवादन, शीतल कोलवालकर यांचे कथ्थक व सुरंजन खंडाळकर यांच्या गायनाने रसिकांची मने जिंकली. 

तत्पूर्वी महोत्सवाच्या पहिल्या सत्रात मृण्मयी फाटक-सिकनिस यांचे गायन झाले. राग भीमपलासने सुरूवात करताना त्यांनी "रे बिरहा' व "जा जा रे अपने मंदिरवा' या बंदिशी गायल्या. त्यानंतर तराना गायल्या. भीमसेन जोशी निर्मित कलाश्री रागातील बंदीश सादर केली. "वद जाऊ कुणाला शरण' या नाट्यगीताने त्यांनी गायनाचा समारोप केला. संवादिनीची साथ ज्येष्ठ पंडित अण्णा बुवा बुगड यांनी तर तबल्याची उत्तम साथसंगत प्रा. महेश देसाई यांनी केली. पहिल्या सत्रातील दुसरी प्रस्तुती सांगलीचा तरुण गायक सुकृत ताम्हनकर याने दिली. "मुलतानी' रागाने गाण्याची सुरूवात करताना त्याने रसिकांची मने जिंकली. त्याच्या गाण्यातून खर्जातील रियाज अत्यंत उठावदार आणि प्रभावी जाणवला. नाट्यगीत "गुंतता हृदय हे' सादर करून "पद्मनाभा नारायणा' अभंगाने समारोप केला. 

दुसऱ्या सत्रात संगीत सम्राट कार्यक्रमातील विजेती नंदिनी गायकवाड हीने रसिकांची दाद मिळवली. "राग पूर्वी' ने सुरवात केली. नंतर "घेई छंद मकरंद' हे नाट्यगीत सादर करून वाहवा मिळवली. अभंग गायनाने समारोप केला. मयंक बेडेकर व सारंग कुलकर्णी, सनतकुमार बडे, केतन आठवले यांनी संगीत साथ केली. 

ठाणे येथील निवेदक विघ्नेश जोशी व विजय कडणे यांनी सुत्रसंचालन केले. श्री. जोशी यांनी उत्कृष्ठ माहितीपूर्ण आणि रंजक शैलीतून निवेदनातून संगीत मैफलीत रंगत आणली. त्यांचा सत्कार करण्यात आला. ध्वनी व्यवस्था शरद शहा यांनी केली. बाळासाहेब कुलकर्णी यांनी आभार मानले.

संपादन : युवराज यादव