सांगली पुन्हा बनतेय खोक्‍यांचे शहर; पालिका प्रशासन सुस्तावलेले

अजित झळके
Tuesday, 15 December 2020

सांगली खोक्‍यांचे शहर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कुणीही उठावे आणि कुठेही खोके उभे करावे, इतका स्वैराचार सुरू झाला आहे.

सांगली ः खोक्‍यांचं शहर म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या सांगलीने सन 2008 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मोकळा श्‍वास घेतला. शहर खोकीमुक्त झाले. पण, या शहरात चांगले झालेले, फारकाळ टिकेल, इतके भाग्य कुठले? आता पुन्हा एकदा हे खोक्‍यांचे शहर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कुणीही उठावे आणि कुठेही खोके उभे करावे, इतका स्वैराचार सुरू झाला आहे. एकीकडे कारभारी आणि अधिकारी यांच्या संगनमताने शहरातील खुल्या जागांचा बाजार मांडला जात असताना, मोकळ्या व मोक्‍याच्या जागांना खोकी वेढत आहेत. विस्तारित भागात तर त्याला काही मर्यादाच राहिल्या नाहीत. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. त्या ज्या मार्गावरून येणार होत्या, त्या मार्गावर खोक्‍यांचे शहर वसले होते. सांगलीला खोक्‍यांचे शहर का म्हणतात, त्याचा नमुना सगळीकडे पहायला मिळत होता. त्यावेळी धाडसी कारवाई हाती घेण्यात आली आणि खोक्‍यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेत खोकी काढण्यात आली. काळी खण, स्टेशन रोड, पोस्ट ऑफिस या ठिकाणची खोकी हटवल्यानंतर शहराने मोकळा श्‍वास घेतला होता. त्यावेळी शहर खोकीमुक्त झाल्याचा ढोल वाजवला गेला. त्यातील अनेक खोक्‍यांचे पुनर्वसन करण्यात आले. पोस्ट कार्यालयाच्या समोर गणेश मार्केट साकारले गेले. तेथे खोकीधारक गेले आणि त्यांना तेथे व्यवसायही मिळाला. 

आता शहरात नवा बाजार मांडला गेला आहे. त्यात सारे भागीदार आहेत. पद्धतशीरपणे रिकाम्या जागांवर एकेक करून खोकी उभी रहायला लागली आहेत. काही खोकी मुव्हेबल आहेत तर काहींनी शेड उभारलेत, फरश्‍या घालून व्यवसाय सुरू केलाय. एकाकडे दुर्लक्ष केले, तर तेथे डझनभर पाय पसरायला मागे पहात नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच आता घडतेय. हळूहळू शहराला पुन्हा खोक्‍यांचा वेढा पडू लागला आहे. पुन्हा सांगली खोक्‍यांचं शहर होत आहे. 

इथे पडलाय खोक्‍यांचा वेढा 

  • मथुबाई गरवारे कॉलेजची मागील बाजू 
  • विश्रामबाग चौकात पाण्याच्या टाकीखाली 
  • स्फूर्ती चौक, झुलेलाल चौक 
  • सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरची बाजू 
  • कुपवाडला जिल्हा परिषदेच्या जागेत 
  • कुपवाड फाटा लक्ष्मीमंदिर जवळ 
  • संजयनगरचा अहिल्यादेवी होळकर चौक 

मूळची खोकी किती? 

जुन्या खोक्‍यांचे एक रजिस्टर आहे. त्यावर जुने क्रमांक आहेत. ते बाहेर काढायला हवे. त्यावर किती नोंदी आहेत, ते तपासले पाहिजे. तेथूनच चोरी सापडायला सुरवात होईल. ज्यांचे पुनर्वसन झाले आहे, त्यांनी पुन्हा खोकी घातली आहेत. त्यावर कारवाई का होत नाही? गणेश मार्केटमध्ये पुनर्वसन झालेल्या ठिकाणी पोटभाडेकरून नेमले आहेत. मूळचे लोक नवी खोकी घालून बसली आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे. नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी महापालिकेला हिंमत असेल तर रजिस्टर काढून बसा, असे आव्हान दिले आहे. 

सिव्हिलजवळ धोका, तरी... 
येथील वसंतदादा शासकीय रुग्णालय परिसरातील खोक्‍यांवर महापालिकेचा आशीर्वाद आहे. त्यांना धक्का लावायचे धाडस केले जात नाही. या खोक्‍यांचे गर्दीने काही जीव गेले, वाहतूक कोंडी तर नित्याची. तिथे शंभर खोकी आहेत. विश्रामबाग चौकात खोकीवाल्यांनी पाय पसरले आहेत. शंभर फुटी रस्त्यावर ओळीने खोकी नाहीत, मात्र मोकळी जागा दिसली की डल्ला मारला जातोय. 

पदपथ जिरवले 
मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या पिछाडीस खोक्‍यांची रांगच आहे. त्यांनी पदपथ जिरवला आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli is a re-emerging city of stalls; Municipal administration sluggish