सांगली : शिवसेनेतील बंडखोरी कोणाच्या पथ्यावर ?

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले.
Uddhav Tahckeray
Uddhav TahckeraySakal

सांगली : शिवसेनेतील बंडखोरीचे लोण आता जिल्ह्यापर्यंत पोचले आहे. शिवसेनेचे एक जिल्हाप्रमुख शिंदे गटाकडे गेले आहेत, तर दुसरे जिल्हाप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत. युवा सेनेतही बंडखोरी झाली आहे. शिवसेनेतील बंडखोरीचा लाभ कोणाला होणार, हे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. अडीच वर्षांचे हे ठाकरे सरकार कधीतरी गडगडणार होतेच; पण ते शिवसेनेमुळेच गडगडेल, असे वाटत नव्हते. मात्र भाजपचे ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेतच फूट पाडून त्यांच्या आमदारांना बंडखोरीस भाग पाडले. या बंडखोरीमुळे शिवसेनेत आता शिंदे गट आणि ठाकरे गट अशी फूट पडली आहे. त्याचे पडसाद सांगलीतही उमटले आहेत.

जिल्हा परिषदेतही पडसाद उमटणार

शिवसेनेतील बंडखोरीचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही उमटण्याची शक्यता आहे. विशेषकरून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत याचे काय परिणाम होतील, हे पाहणे औत्सुक्याचे आहे; त्यातही खानापूर तालुक्यात अनिल बाबर यांचे तीन जिल्हा परिषद सदस्य गत सभागृहात होते. येत्या निवडणुकीतही बाबर गट हा शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करेल, हे उघड आहे आणि त्यांचा पाठिंबा हा भाजपला राहणार, हेही स्पष्ट आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट स्वतंत्र लढणार, असे दिसते. एक गट भाजपसोबत जाईल, तर दुसरा महाविकास आघाडी सोबत जाईल, अशी शक्यता आहे. परंतु यामुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी होणार. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यातील तीन जागा लढवल्या होत्या. यातील खानापूर-आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. मात्र ऐनवेळी शिवसेनेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा लढवणाऱ्या अजितराव घोरपडेंना पराभव पत्करावा लागला.

पलूस-कडेगाव मतदार संघातून विश्वजित कदम यांनी शिवसेनेचे संजय विभूते यांचा पराभव केला. इस्लामपूर मतदारसंघातून नागनाथ अण्णांचे नातू गौरव नायकवडी यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. मात्र सध्या ते भाजपच्या व्यासपीठावर दिसतात. यातील अनिल बाबर सध्या बंडखोर शिवसेनेचे नेते आहेत. अजितराव घोरपडे हे निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेनेत सक्रिय असलेले दिसले नाहीत, तर संजय विभूते ठाकरेंच्या पाठीशी आहेत.

जिल्हा परिषदेच्या गत सभागृहात अनिल बाबर गटाचे; म्हणजेच शिवसेनेचे तीन सदस्य होते. अजितराव घोरपडे गटाचे दोन सदस्य होते. आता जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही गट उतरल्यास शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडेल. याचा लाभ भाजपला कितपत होईल आणि शिवसेना पुन्हा ताकद दाखवू शकेल काय, हे निवडणुकीत स्पष्ट होईल.

जिल्ह्यातही बंडखोरी

शिवसेनेचे एक जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शिंदे गटाचा बंडाचा झेंडा धरला आहे, तर दुसरे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी ठाकरेंच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले आहे. यातील आनंद पवार हे जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आहेत आणि जयंत पाटलांनी त्यांना अडचणीत आणल्याचा आरोप स्वतः एकनाथ शिंदे यांनी केला होता; तर दुसरे संजय विभूते हे खानापूर तालुक्यातील आहेत आणि तेथील आमदार अनिल बाबर हे शिवसेनेचे असून ते शिंदे गटात आहेत. त्यानंतर युवा सेनेतही बंडखोरी झाली असून काही युवा सैनिक शिंदे गटात गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com