सांगलीत बंगला फोडून साडेपाच लाखांची चोरी 

बलराज पवार
रविवार, 15 एप्रिल 2018

साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅमचे मंगळसूत्र, नेकलेस, टॉप्स्‌, तोडे, दोन तोळ्याची चेन, सात अंगठ्या, मोत्याचे सेट असा दागिन्यांचा ऐवज तसेच घड्याळ, गॉगल व 40 हजाराची रोकड सापडली. असा सर्व साडेपाच लाखांचा मुद्देमाल घेऊन त्यांनी पोबारा केला. 

सांगली : जुना बुधगाव रस्त्यावरील विकासनगरमधील एक बंद बंगल्याचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी प्रदीप श्रीराम पाटील यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. घटनास्थळी श्‍वान पथक, 
ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तज्ज्ञांना महत्वाचे ठसे मिळाले आहेत. 

प्रदीप पाटील यांचा जुना बुधगाव रस्त्यावर विकासनगरमध्ये बंगला आहे. ते मुंबईत स्टेट बँकेत नोकरीस असल्याने तेथेच राहतात. तर मुले परदेशात नोकरीस आहेत. त्यामुळे सांगलीतील बंगल्यात त्यांची पत्नी राहते. त्या 12 एप्रिल रोजी मुंबईला गेल्या होत्या. त्यामुळे बंगला बंदच होता. शनिवारी 
(ता. 14) सायंकाळी प्रदीप पाटील यांचे बंधू दत्ताजी पाटील यांना प्रदीप पाटील यांच्या बंगल्याचा दरवाजा थोडा उघडला असल्याचे दिसले. मात्र, घरी कोणी नसताना बंगला कसा उघडा असा संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मुख्य दरवाजाचा कडी, कोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी लगेच प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तसेच संजयनगर पोलिसांनाही माहिती दिली.

पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यावेळी चोरीचा प्रकार 
उघडकीस आला. चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाट उघडले. त्यातील साहित्य खोलीत विस्कटून टाकले. त्यांनी लॉकर उघडला असता त्यामध्ये साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅमचे मंगळसूत्र, नेकलेस, टॉप्स्‌, तोडे, दोन तोळ्याची चेन, सात अंगठ्या, मोत्याचे सेट असा दागिन्यांचा ऐवज तसेच घड्याळ, गॉगल व 40 हजाराची रोकड सापडली. असा सर्व साडेपाच लाखांचा मुद्देमाल घेऊन त्यांनी पोबारा केला. 

शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा पंचनामा सुरु होता. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्‍वानपथक पाचारण केले. पाटील यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर जाऊन श्‍वान घुटमळले. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन 13 एप्रिल रोजी मध्यरात्री चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्रदीप पाटीलही 
मुंबईतून सांगलीत दाखल झाले. त्यांची फिर्याद घेण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

Web Title: sangli Robbery bunglow Robbery 5 lakh have been theft