सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेसह राज्यातील सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. 19 नोव्हेंबरला सहा जागांसाठी मतदान असून ता. 22 रोजी मतमोजणी आहे.

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेसह राज्यातील सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. 19 नोव्हेंबरला सहा जागांसाठी मतदान असून ता. 22 रोजी मतमोजणी आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागांची मुदत 5 डिसेंबरअखेर आहे. तत्पूर्वी निवडणुका होणे गरजेचे आहे. सांगली-सातारासह पुणे, नांदेड, जळगाव, यवतमाळ आणि भंडारा-गोंदियाचा यात समावेश आहे. या जागावाटपासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीत वाटाघाटी सुरू आहेत. सांगली-सातारा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसने मागितली आहे. सध्या या जागेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रभाकर घार्गे आहेत. त्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसने ही जागा मागितली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम इच्छुक आहेत. ही निवडणूक लढण्यास आपण तयार असल्याचे मोहनराव कदम यांनी आज सांगलीत सांगितले.

दरम्यान, पालिका, नगरपंचायत निवडणुकांच्याबरोबरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

निवडणूक कार्यक्रम

 • अधिसूचना जारी करण्याची तारीख 26 ऑक्‍टोबर
 • उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत 2 नोव्हेंबर
 • अर्ज छाननी मुदत 3 नोव्हेंबर
 • उमेदवारी माघारीची मुदत 5 नोव्हेंबर
 • मतदानाची तारीख 19 नोव्हेंबर (सकाळी आठ ते दुपारी चार)
 • मतमोजणीची तारीख 22 नोव्हेंबर (सकाळी आठपासून)

मुदत संपणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार

 • प्रभाकर घार्गे : सांगली-सातारा
 • अमरनाथ राजूर : नांदेड
 • अनिल भोसले : पुणे
 • राजेंद्र जैन : भंडारा-गोंदिया
 • गुरुमुख जगवाणी : जळगाव
 • संदीप बाजोरिया : यवतमाळ

मोहनराव कदम लढण्यास तयार
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. पक्षाने आदेश दिला तर ही निवडणूक लढवून ती जिंकण्याचीही मला खात्री आहे. राष्ट्रवादीने जागा सोडली नाही तरी माझ्या नावाला त्यांचा विरोध राहणार नाही, असा विश्‍वास मोहनराव कदम यांनी व्यक्त केला. मी बंडखोरी करणार नाही. स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यास त्याचीही तयारी असल्याचे कदम यांनी सांगितले.

दिलीप पाटीलही इच्छुक
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटीलही या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. या संदर्भात त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. सध्या ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. कॉंग्रेसला जागा न सोडल्यास दिलीप पाटील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

562 मतदार मतदान करणार
सांगली, सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे 562 सदस्य मतदान करणार आहेत. यामध्ये सांगलीचे 261 तर साताऱ्याचे 301 सदस्य आहेत. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघासाठी 531 मतदार होते. त्यानंतर सांगली आणि सातारामध्ये एकेक नगरपालिका अस्तित्वात आल्याने त्यांचे सदस्यही यंदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच पंचायत समित्यांचे सभापती मतदार आहेत.

Web Title: sangli-satara local election declare