दोन खुनांमुळे सांगली हादरली

आरटीओ एजंटचा हरिपूर येथे निर्घृण खून
 सुरेश आण्णाप्पा नांद्रेकर
 रोहन रामचंद्र नाईक
सुरेश आण्णाप्पा नांद्रेकर रोहन रामचंद्र नाईक sakal

सांगली : हरिपूर येथील गजानन कॉलनीत आरटीओ एजंट सुरेश आण्णाप्पा नांद्रेकर (वय ४७) यांचा कुऱ्हाडीने व लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. या हल्ल्यावेळी पतीला वाचवताना पत्नी निमिशा (वय ३५) या देखील गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलिस व एलसीबीच्या पथकाने संशयित निखील सुभाष साळुंखे (वय २१, हरिपूर), किरण हणमंत घस्ते (वय २५, मालू हायस्कुलजवळ, हरिपूर रस्ता), दत्ता यल्लाप्पा खांडेकर (वय १९, कवलापूर), विजय सदाशिव पाटील (वय २३, गरवारे कॉलेजजवळ सांगली) या चौघांना अटक केली आहे. दुचाकी चोरीस गेल्यानंतर झालेल्या वादातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश नांद्रेकर हा आरटीओ एजंट म्हणून काम करत होता. हरिपूर रस्त्यावरील गजानन कॉलनीत त्यांचे घर आहे. पत्नी निमिशा, मुली शिवाणी व सायली यांच्यासह राहत होता. सोमवारी (ता. २१) सायंकाळी घर कामे आटोपल्यानंतर सुरेश आणि पत्नी हे दोघेजण संकष्टीनिमित्त सायंकाळी ७.३० वाजता देवदर्शनासाठी घराबाहेर पडले. बसस्थानक परिसरातील हरिमंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दुचाकीत सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील पंपावर पेट्रोल टाकले. सव्वा आठच्या सुमारास दोघेजण पुन्हा घराकडे निघाले. वाटेत हरिपुरातील बागेतील गणपतीलाही गेले. तेथे दर्शन घेतल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास दोघेजण घराकडे निघाले.

गजानन कॉलनीत वळाल्यानंतर पन्नास ते शंभर मीटर अंतरावर घर दूर असतानाच एका कोपऱ्यावर झाडाजवळ दोन्ही बाजूला दबा धरून बसलेल्या दोघांपैकी एकाने समोर येत कुऱ्हाडीने सुरेश यांच्या तोंडावरच वार केला. त्यामुळे दुचाकीवरून दोघेजण खाली पडले. तेव्हा दुसऱ्याने देखील हल्ला चढवला. खाली पडलेल्या सुरेशवर दोघांनी तोंडावर व डोक्यावर वार करण्यास सुरवात केली. पतीला वाचवण्यासाठी पत्नी धावली. तेव्हा हल्लेखोरांनी तिच्याही डोक्यावर व हातावर वार केले. तिने आरडाओरड केल्यानंतर कॉलनीतील लोक धावले. तसेच सुरेश यांच्या मुली देखील आवाज ऐकून धावल्या. तेवढ्यात मागून दुचाकीस्वार तेथे आला. दोघेही हल्लेखोर दुचाकीवर मागे बसले आणि त्यांनी पलायन केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरेश यांना नागरिकांच्या मदतीने तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्यांची प्रकृती फारच चिंताजनक बनली होती. डोक्यावर व चेहऱ्यावर वार झाल्यामुळे भरपूर रक्तस्राव झाला होता. उपचार सुरू असताना आज (ता. २२) पहाटे दोनच्या सुमारास सुरेश यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच हल्लेखोरांचा शोध सुरू केला. प्राथमिक तपासानंतर आज (ता. २२) निखिल साळुंखे, किरण घस्ते, दत्ता खांडेकर, विजय पाटील या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता दुचाकीच्या वादातून खून झाल्याचे स्पष्ट झाले. संशयितापैकी एकाची दुचाकी सुरेश यांच्याकडे होती. काही दिवसांपूर्वी ही दुचाकी चोरीस गेली होती. तेव्हा संशयिताने दुचाकीचे पैसे सुरेश यांच्याकडून वसूल केले. तेव्हा सुरेश यांनी संशयितास ‘तूच दुचाकी चोरली असून, परत माझ्याकडून पैसे वसूल केलेस’, असे म्हणाले होते. त्यावरून वाद झाला होता. याच वादातून चौघांनी सुरेश यांच्यावर पाळत ठेवून काटा काढल्याचे स्पष्ट झाले. चौघांनी खुनाची कबुली दिली असून उपनिरीक्षक किरण मगदूम तपास करत आहेत.

एलसीबी-ग्रामीणची कारवाई-

खुनानंतर चौघेजण पसार झाले होते. एका वकीलास भेटण्यासाठी निखील व किरण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दत्ता व विजय याला देखील ताब्यात घेऊन अटक केली. एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक निरीक्षक प्रदीप शिंदे, प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक किरण मगदूम, सागर पाटील, स्मिता पाटील आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

सांगलीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

सांगली: तरुणांच्या दोन गटांत एका बारमध्ये झालेल्या किरकोळ वादातून रोहन रामचंद्र नाईक (वय २८, लक्ष्मीनारायण कॉलनी) याचा धारदार शस्त्राने पाठीत भोसकून खून केल्याचा प्रकार सायंकाळी सातच्या सुमारास घडला. चार ते पाच हल्लेखोरांनी सिव्हिल हॉस्पिटल ते बसस्थानक रस्त्यावरील अनंतगंगा भवनशेजारील कौस्तुभ बिल्डिंगसमोर हा खून केला. खुनानंतर हल्लेखोर पसार झाले.

पोलिसांनी दिलेली माहिती, रोहन नाईक हा पेंटिंगची कामे करतो. लक्ष्मीनारायण कॉलनीत तो राहतो. आज रंगपंचमीमुळे तो घरीच होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिर्याणी करायची आहे, असे घरात सांगून तो बाहेर पडला. तेव्हा आजी त्याला ‘रंगपंचमी आहे, कशाला जातोस’ असे म्हणाली. परंतु तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तो बाहेर पडला. सिव्हिल हॉस्पिटल ते बसस्थानक रस्त्यावरील एका बारमध्ये तो आणि मित्र दारू पिण्यासाठी बसले. तेव्हा तेथे आणखी काही मित्रांचा ग्रुप आला होता. तेथे दारूच्या नशेत दोन गटांमध्ये वादावादी झाली. प्रकरण हमरीतुमरीवर आले. तेव्हा काहींनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

रोहन नाईक तेथून बाहेर पडला. तेवढ्यात दुसऱ्या गटातील काहींनी बाहेर जाऊन हत्यार आणले. रोहन नाईक तेथून बाहेर पडल्यानंतर चार ते पाचजण त्याच्या मागावर होते. अनंतगंगा भवनजवळ कौस्तुभ बिल्डिंगजवळ त्याला गाठले. गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले. एका मागोमाग एक असे चार वार पाठीत खोलवर झाल्यानंतर रोहनला बचावाची संधीच मिळाली नाही. तो खाली पडल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. रहदारीच्या रस्त्यावर खुनाच्या घटनेनंतर परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी आले. परिसरातील गर्दी हटवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस उपाधीक्षक अजित टिके, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, विश्रामबागचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरणचे पथक होते. खुनानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मृताचे नाव रोहन नाईक असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा भाऊ व आईला बोलावून माहिती दिली. रोहनचा खून झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. रोहनचे मित्रही मोठ्या संख्येने सिव्हिलमध्ये जमले होते.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच जणांनी हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध सुरू होता. लवकरच हल्लेखोरांची माहिती हाती लागेल, असे निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com