हळदीची आवक वाढल्याने सांगलीत दोन टप्प्यात साैदे

हळदीची आवक वाढल्याने सांगलीत दोन टप्प्यात साैदे

सांगली - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून हळदीची आवक वाढली आहे. त्यामुळे दिवसांतून दोन टप्प्यांत सौदे होत आहेत. सकाळच्या टप्प्यात १५ हजार क्विंटलपर्यंत तर दुपारच्या टप्प्यात चार ते पाच हजार क्विंटल आवक होते. सध्या ८१०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. 

देशातील हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या बाजारपेठेत सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, जळगाव या जिल्ह्यांबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू या राज्यांतूनही हळदीची मोठ्या प्रमाणात आवक प्रतिवर्षी होते. सांगली बाजार समितीतील पारदर्शक सौद्यांवर शेतकऱ्यांचा विश्‍वास आहे. परिणामी आवक वाढतच आहे. राज्यात यंदा हळद लागवड क्षेत्रात २२ टक्के वाढ झाली आहे, मात्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहिले. तसेच हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे लागवड वाढली तरी उत्पादनात फारशी वाढ होणार नसल्याचे चित्र आहे. 

बाजार समितीमध्ये मार्च महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात हळदीची आवक वाढली आहे. त्यामुळे दिवसातून दोन टप्प्यात सौदे काढले जात आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागल्यामुळे सकाळच्या टप्प्यात १२ ते १५ हजार क्विंटलपर्यंत आवक होऊन सौदे काढले जातात. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात चार ते पाच हजार क्विंटलची आवक होत आहे. सध्याचा दर ८१०० ते ९ हजार रूपये प्रतिक्विंटल दर आहे. हळदीच्या दरात यंदा फारसी वाढ न होता हाच दर स्थीर राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मागील आठवड्यात राजापुरी हळदीचा दर ८१०० ते ९ हजार रूपये राहिला. तर परपेठ हळदीचा दर प्रतिक्विंटल ५७७५ ते ६३०० रूपये इतका राहिला. 

‘‘बाजार समितीत मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळदीची आवक वाढली. दिवसातून दोन वेळा सौदे काढले जातात. मेअखेर दोन वेळा सौदे सुरू राहतील.’’ 
-दिनकर पाटील
(सभापती, बाजार समिती सांगली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com