सांगली : सत्तेला हाताशी धरून चुकीची प्रभाग रचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ward formation

सांगली : सत्तेला हाताशी धरून चुकीची प्रभाग रचना

वाळवा : सत्तेला हाताशी धरून झालेल्या चुकीच्या प्रभाग रचनेचा निषेध म्हणून उद्या (ता. ६) गावात बंद पाळण्यात येईल, अशी माहिती सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर आणि माजी सरपंच गौरव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,‘‘गाव बंद हा या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या प्रभाग रचनेविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या प्रकरणात पालकमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. अशा पद्धतीने यंत्रणेला हाताशी धरून सत्ता मिळवण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. वास्तविक पाहता सुधारित प्रभाग रचना अमलात आणताना सत्ताधारी गटाला माहिती देणे क्रम प्राप्त असते‌.

मात्र, महसूल विभागाने तसे केले नाही. सध्याची प्रभाग रचना निर्माण करताना सगळ्या घटकांना अंधारात ठेवले आहे. व्यक्तिगत फायद्यासाठी महसूल विभागाला हाताला धरून ही प्रभाग रचना अंतिम करण्याचा प्रयत्न जनतेच्या ताकदीने आम्ही उधळून लावू’’‌. ते पुढे म्हणाले,‘‘ग्रामपंचायतीत स्थापनेपासून पहिल्यांदाच अनुसूचित जातीसाठी सरपंच पद आरक्षित आहे. मात्र या प्रवर्गातील मतदारांची संख्या जिथे जास्त आहे तो सोडून आपल्या हातात सत्ता ठेवण्यासाठी हे पद प्रभाग क्रमांक तीनमध्ये घुसविण्यात आले आहे.

केवळ सरपंच पदावर डोळा ठेवून, गावातील प्रमुख राजकीय पक्षांना डावलून झालेली ही प्रभाग रचना आम्ही कदापिही अस्तित्वात येवू देणार नाही. या प्रभाग रचनेला विरोध करण्यासाठी सोमवारी (ता. ६) गावात होणा-या सार्वजनिक बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. त्यानंतर दोन दिवसात इस्लामपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. शिवाय या प्रभाग रचनेविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे डॉ. माळी, अहिर, नायकवडी यांनी सांगितले. या वेळी उमेश

कानडे, इसाक वलांडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli Ward Formation Wrong Power In Hand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top