सांगलीत महापुराची स्थिती 'जैसे थे'

बलराज पवार
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सांगलीत महापुराची स्थिती जैसे थे असून अजूनही हजारो लोक अडकले आहेत. आज सकाळी आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी 57 फूट 5 इंच इतकी होती. पूरग्रस्तांचे मदतीसाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी त्यांच्या नियोजनात गोंधळ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूरग्रस्तपर्यंत वेळेत मदत पोहोचत नाही.

सांगली - सांगलीत महापुराची स्थिती जैसे थे असून अजूनही हजारो लोक अडकले आहेत. आज सकाळी आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी 57 फूट 5 इंच इतकी होती. पूरग्रस्तांचे मदतीसाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी त्यांच्या नियोजनात गोंधळ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूरग्रस्तपर्यंत वेळेत मदत पोहोचत नाही.

सांगली महापुराचा वेढ्यात अनेक गावे आहेत. तेथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे स्थानिक लोक धाडस करून गावातीलच होड्यांचा वापर करत आहेत. मात्र ब्रम्हणाळ मधील बोट उलाटण्याच्या  घटनेमुळे त्यातही धोका असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बोटीची वाट पाहणे एवढेच आता ग्रामस्थांच्या हातात आहे.

शहरातील पाणी पातळी उच्चांकी पातळीवर गेल्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांना आता घरांच्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर आसरा घ्यावा लागला आहे. परंतु त्यांच्याकडील दूध, पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ यांचा साठा संपत आला आहे. आता पुरातून बाहेर पडता येत नसले तरी किमान या वस्तूंची तरी मदत व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती यांच्यासाठी या गोष्टी तातडीने मिळणे आवश्यक आहे.

त्यासाठी अनेक जण सोशल मीडिया वरून कुठल्या भागात किती नागरिक अडकले हे नाव पत्त्या सहित टाकत आहेत. त्याठिकाणी कोणत्या मदतीची गरज आहे, त्याची माहिती देत आहेत. परंतु प्रशासनाकडे या माहितीचा आधार घेऊन मदत पोहोचण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही त्याचा फटका बसत आहे.

महापुरात निम्म्याहून अधिक सांगली शहर अडकले आहे. 2005 मध्ये आलेल्या महापुरातही ज्या भागात पाणी आले नव्हते असे माधवनगर रोड, कॉलेज कॉर्नर, कलेक्टर बंगला, शंभर फुटी रोड, धामणी परिसर या भागातही यंदा पाणी भरले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचा शहरातील आकडा लाखाच्यावर पोहोचली आहे. सध्या पंधरा हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे तरी अजूनही पुराच्या वेढ्यात पस्तीस ते चाळीस हजार नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना सुरक्षित स्थलांतर करणे त्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभी आहे.

आज सकाळपासूनच मदत कार्य पुन्हा जोमाने सुरू झाले आहे महापालिका क्षेत्रात पूरग्रस्त भागात एनडीआरएफ महापालिका लष्कर या सर्वांचे मिळून तीस बोटी मदत कार्यात सहभागी झाले आहेत. त्याशिवाय स्वयंसेवी संस्था काही मंडळांच्या बोटी तराफे अगदी रिक्षाचे फायबरचे टप उलटे करून त्याचाही वापर करून पूरग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Water Flood Condition Army Boat