सांगली पोलिस ‘काबिल’ बनणार केव्हा?

सांगली पोलिस ‘काबिल’ बनणार केव्हा?

सांगली - तलवारी नाचवत, जोरदार दगडफेक करीत दोन गटांनी मध्यरात्री नागरिकांत दहशत निर्माण करीत पोलिस यंत्रणेलाच ‘चॅलेंज’ केल्याचे दिसले. गुंडगिरी पुन्हा फोफावली आहे. किरकोळ कारणावरूनही तलवारी काढल्या जात आहेत. पोलिस मात्र सुस्त बनलेत. दोन्ही बाजूंची तक्रार आली तरच नोंदवून घेत कागदपत्रे रंगवण्यापलीकडे त्यांना कामच राहिले नाही.

संवेदनशील खणभाग परिसरात ‘कोम्बिंग’ ऑपरेशन केल्यास तलवारींचा खच जमा होईल, अशीच स्थिती दिसते. गुंड ‘रईस’ बनत असताना पोलिस ‘काबिल’ केव्हा बनणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

क्रिकेट सामना ‘टाय’ झाल्यानंतर रविवारी मध्यरात्री असिफ बावा आणि गुंड टोल्या पोतदार यांच्या गटात जोरदार वाद झाला. टोल्याच्या साथीदारांनी बावा यांना घरात घुसून धक्काबुक्की व दमदाटी केली. त्याचा बदला म्हणून बावा समर्थकांनी टोल्याच्या घरावर मध्यरात्रीनंतर जोरदार दगडफेक करीत दुचाकींची नासधूस केली. परिसरातील एका ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात गुंडांची दगडफेक चित्रीत झाली. गुंडांचा त्वेष पाहिल्यानंतर हिंसाचार उफाळला असल्यासारखेच दिसून येते. दगडफेक आणि तलवारी नाचवत दहशत माजवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. परस्परविरोधी फिर्याद दाखल करून घेऊन कागदे रंगवली.

पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होण्याची वाट बघण्यापूर्वीच गुंडात वचक निर्माण होईल, अशी ‘पोलिसगिरी’ आवश्‍यक बनली आहे. पोलिस ठाण्यात उठबस असलेले आणि सामाजिक कार्याचा आव आणणारेच गुंडगिरी करीत असतील त्यांना लगाम घालण्याची गरज आहे. मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावरची गुंडगिरी आता मागे पडली. मटका, त्यातून मिळणार ‘मनी’ अनेकांना भुरळ घालत आहे. त्यातून वर्चस्ववाद सुरू झालाय. जरा कुठे ‘खुट्ट’ झाले की मिनिटात तलवारी काढल्या जातात. सांगलीत खणभाग परिसर पुन्हा संवेदनशील बनलाय. सहा महिन्यात तीन-चार वेळा तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रकार घडला. पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्यापुरती कामगिरी केली. परंतु गुंडगिरीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’ राबवण्याची गरज आहे. 

सहा महिन्यात दोन-तीनवेळा हाणामारीतून ‘दंगल’ होण्याचा प्रकार पोलिसांनी टाळला. मात्र वेळीच गुंडांना आवर घालून त्यांच्यावर कारवाई करून वचक ठेवला पाहिजे. न्यायालयातून सहीसलामत बाहेर आलेले अनेक गुंड सध्या राजकारण्यांच्या वळचणीला गेलेत. त्यांचे डिजिटल फलक अधूनमधून झळकत आहेत. त्यामुळे पोलिस कारवाईसाठी दबकतात. गुंड ‘रईस’ बनत असताना पोलिसांनी कारवाईसाठी ‘काबिल’ आहे, हे सिद्ध आहे, हे करण्याची वेळ आली आहे.

येथे हवी कारवाई
खणभाग, इंदिरानगर, हनुमाननगर, शंभरफुटी, संजयनगर, अहिल्यानगर, पंचशीलनगर आदी परिसर नगर नव्हे, तर गुंडगिरीचे आगर बनले आहे की काय, अशी शंका येते. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे चार टोळ्यांना ‘मोका’ तर सहा जणांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली. त्यांनी गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठी पाऊल उचलले असताना पोलिस ठाणे अधिकाऱ्यांनी साथ दिली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com