
Sangli Politics : शिराळा येथील उत्तर भागातील जिल्हा परिषद गट व गणाला विशेष महत्त्व दिले जाते. कारण याचा उत्तर भागातून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. येथे अनेकवेळा नाईक विरुद्ध नाईक असा संघर्ष झालेला आहे. गत निवडणुकीत वाकुर्डे गणातून पंचायत समितीचे माजी सभापती सम्राटसिंह नाईक यांनी आपले राजकीय बस्तान बसवले आहे.
या वाकुर्डे जिल्हा परिषद गटात मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार विरुद्ध महायुती (भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे भगतसिंग नाईक) असा सामना रंगणार असे प्राथमिक चित्र असले तरी ऐनवेळी पक्षापेक्षा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी गटाचे राजकीय समीकरण जुळण्याची दाट शक्यता आहे. गत निवडणुकीतील मित्र या निवडणुकीत राजकीय शत्रू म्हणून एकमेकांसमोर येणार आहेत.