भाजप-विश्‍वास, कॉंग्रेस-अतिआत्मविश्‍वास, राष्ट्रवादी-सावध 

विष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 7 जानेवारी 2017

सांगली - जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हा लागायची तेव्हा लागो, सर्वच राजकीय पक्षांनी रान जोरात तापवायला सुरू केले आहे. विकासकामांच्या उद्‌घाटनाच्या माध्यमातून दिवसाला नारळ किती फुटतात त्याचा हिशेबही लागत नाही. झेडपीतील सत्ताधारी राष्ट्रवादी, कॉंग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत ताकदीचा अंदाज आल्याने भाजपही सत्तास्पर्धेत दिसल्यास नवल वाटू नये, अशी स्थिती आहे. शिवसेना आणि स्वाभिमानी संघटनेनेही डरकाळी फोडली आहे. 

सर्वच पक्षांना स्वबळाची खुमखुमी यापूर्वीच जाहीर केल्याने बहुरंगी लढतींची शक्‍यता आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांच्यात आघाडी होणार का हे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही पक्षांची आघाडी झाली तरीही भाजप स्पर्धेत असणार हे नक्की. निवडणूकच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे नेते-कार्यकर्ते सध्या सुसाट पळू लागलेत. विधान परिषदेतील विजयानंतर कॉंग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांना झेडपीवर आपलाच झेंडा फडकल्याचे स्वप्न पडून लागले आहे. हा अतिआत्मविश्‍वास तर ठरणार नाही ना असेच चित्र आहे. जिल्हा परिषदेत पंधरा वर्षे सत्तेत किंवा सत्तेसोबत राहूनही राष्ट्रवादीची भूमिका अजून सावध आहे. 

पश्‍चिम भागातील शिराळा, वाळवा विधानसभा मतदार संघात स्वाभिमानीची भूमिका महत्त्वाची असेल. स्वाभिमानी कॉंग्रेसबरोबर, की शिराळ्यातील नाईक आघाडीसमवेत जाणार हा खरा प्रश्‍न आहे. शिवाय खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला भाजप जवळ करणार की स्वतंत्र लढणार यावर पुढची गणिते अवलंबून राहणार आहेत. 

झेडपीत राष्ट्रवादी सत्तेत आहे. कॉंग्रस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही ओळख या निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी आघाडीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांनी तसे संकेत चार दिवसांपूर्वी दिले. मात्र कॉंग्रेसने त्यावर प्रतिक्रियाच दिलेली नाही. अर्थात यासाठी राज्यपातळीवर काही घडामोडींचे संकेत असल्याचे सांगण्यात येते. सांगली-हातकणंगले लोकसभा, चार आमदारांमुळे कमळ फुलले. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे आउटसोर्सिंग सुरूच राहिले. त्याचा फटका तासगाव, इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादी व कॉंग्रेसने भाजपला टक्कर देण्याची तयारी केली आहे. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, तर आमदार जयंत पाटील, कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार पतंगराव व मोहनराव कदम यांचे जिल्हाभर दौरे आणि विकास कामांची उद्‌घाटने सुरू आहेत. 

Web Title: sangli zp & panchayat elections