झेडपीचे 30 वर्षांत 11 अध्यक्ष, चौघेच राजकारणात सक्रिय 

विष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सांगली - गेल्या 30 वर्षांतील झेडपीचे अध्यक्ष आता नेमके काय करतात हे पाहणे रंजक आहे. राज्यात सन 1995 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आरक्षण लागू झाले.

सांगली - गेल्या 30 वर्षांतील झेडपीचे अध्यक्ष आता नेमके काय करतात हे पाहणे रंजक आहे. राज्यात सन 1995 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आरक्षण लागू झाले.

झेडपी अध्यक्ष, पंचायत समिती सभापती ते गावचे सरपंच पदांसाठीही आरक्षण काढण्यात येऊ लागले. आरक्षित जागांमुळे निवडून आलेल्यांपैकी बहुतांश चेहरे अपवाद वगळता पुढे राजकीय प्रवाहाबाहेर फेकले गेलेत. मागील तीस वर्षांत 11 झेडपी अध्यक्ष झालेत. यातील खुल्या गटातून अध्यक्ष झालेल्यांपैकीही आमदार शिवाजीराव नाईक, आमदार मोहनराव कदम, अमरसिंह देशमुख, देवराज पाटील चौघेच राजकारणात सक्रिय आहेत. मात्र आरक्षितमधून अध्यक्षपद मिळालेल्यांचा सध्याचा राजकीय प्रवाशाचा शोधच लागू शकत नाही. अगदी काही जण गावपातळीवर आपले गट ठेवून आहेत. मतदार संघावर पुन्हा आरक्षण पडले तरच त्यांची पुन्हा नावे चर्चेत येतात. 

लोकप्रतिनिधींसाठीची कार्यशाळा म्हणून मिनी मंत्रालयाकडे पाहिले जाते. झेडपी, पंचायत राज स्थापन झाल्यापासून सांगली जिल्ह्यातून 22 जणांना विधानसभा, विधानपरिषद आणि चौघे संसदेवर गेले हे चित्र समाधानकारक आहे. मात्र झेडपी अध्यक्षांमधील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहेत. त्यातही प्रत्येक अडीच वर्षांनी बदलणारे अध्यक्षपदांचे आरक्षण आणि पाच वर्षांत सदस्यांना संधी देण्यासाठी राजकीय पक्षांनी काढलेली टुम यामुळे प्रत्येक पाच वर्षांत दोघांना अध्यक्षपदांची मिळणारी संधी आता चौघांना मिळते आहे. झेडपीचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी म्हणून सत्कार संपेपर्यंत त्यांची मुदत संपायची वेळ येते. अनेकांना तर केवळ फलकावर नाव लावावे एवढाही कालावधी मिळालेला नाही. त्यातही प्रभारी अध्यक्षपदांच्या काळात कारभार बघणाऱ्यांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेचे सलग अकरा वर्षे अध्यक्ष राहिलेले शिराळ्याचे शिवाजीराव नाईक प्रदीर्घ काळ राजकीय पटलावर टिकून आहेत. त्यांना जिल्ह्याची खडानखडा माहिती आहे. त्यांनी पंचायत राज अभियानांमध्ये चांगले काम केले. सन 1985-86 मध्ये सांगली झेडपीचा देशात दुसरा क्रमांक आला. त्याबद्दल 22 सप्टेंबर 1986 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याहस्ते नाईक यांना गौरवण्यात आले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदमही गेली 25 वर्षे राजकारणात टिकून आहेत. ते नुकतेच विधानपरिषदेवरही निवडून गेले. अमरसिंह देशमुखांनी विधानसभा लढवली. ते बॅंकेच्या माध्यमातून सातत्यांने संपर्कात आहेत. देवराज पाटील साखर कारखान्यात संचालक आणि तालुकापातळीवर विविध पदांवर काम करीत आहेत. माजी अध्यक्षा मालन मोहिते देवराष्ट्रे परिसरात महिला कॉंग्रेसच्या माध्यमातून चर्चेत असतात. 

शिवाजीराव नाईक, 1985-95 
मोहनराव कदम, 1995-98 
नंदाताई खोत, 1998-99 
मालन मोहिते, 1999-02 
प्रवीण धेंडे, 2002-05 
अण्णासाहेब गडदे, 2005-07 
कांचन पाटील, 2007-09 
आनंदराव डावरे, 2009-12 
अमरसिंह देशमुख, 2012-13 
देवराज पाटील, 2013-14 
रेशमाक्का होर्तीकर, 2014-16 
स्नेहल पाटील, 2016-मार्च 2017 

झेडपीची स्थापना- 12 ऑगस्ट 1962 
सुरवातीची झेडपी सदस्य-55 (पैकी 6 स्वीकृत), पंचायत समिती सदस्य 98 
सन 2012-17 झेडपी सदस्य 62, पंचायत समिती सदस्य-124 
सन 2017-22 सुधारित लोकसंख्यावर सदस्य संख्या-60, पंचायत समिती सदस्य 120

Web Title: sangli zp poltics