सांगली : ‘ताकारी’ योजनेचे तिसरे पाणीआवर्तन सुरू

१४४ कि.मी.पाणी नेण्यासाठी यंत्रणा सज्ज; तीन तालुक्यांतील शेतीला मिळणार दिलासा
ताकारी’ योजनेचे तिसरे पाणीआवर्तन सुरू
ताकारी’ योजनेचे तिसरे पाणीआवर्तन सुरूSAKAL

वांगी: ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे यंदाचे तिसरे पाणी आवर्तन आजपासून सुरू झाले आहे. सदरचे आवर्तन कालव्यावरील संपूर्ण सिंचनक्षेत्राची तहान भागेपर्यंत सुरू ठेवणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी ‘सकाळ’ला दिली.यापूर्वीचे ताकारीचे दुसरे आवर्तन १३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत सुरू होते.

त्यावेळचे पाणी मुख्य कालव्याच्या १३० कि.मी.पर्यंत मणेराजुरी (ता. तासगाव) येथे पोहोचल्यानंतर बंद केले होते. त्या पाण्याने लाभक्षेत्रातील पिकांना चांगलाच दिलासा दिला होता, मात्र सध्याचा वाढलेला कडक उन्हाळा आणि सिंचनक्षेत्रासाठी जमिनीतून प्रचंड पाणीउपसा होत असल्याने पाणीस्त्रोत आटले असून, पाणी कमी पडू लागले आहे. या भागाला ताकारीशिवाय पर्याय नाही. परिणामी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांतून मागणी होऊ लागली होती. यावर गांभीर्याने विचार करून पाटबंधारेने पाणी तत्काळ सोडण्याचे नियोजन केले. त्यानुसार सोमवारी (ता.१४) सकाळी ९ वाजता टप्पा १ वरील ६ पंप आणि दुपारी १ वाजता सागरेश्वरमधील टप्पा २ वरील ६ पंप सुरू करून पाणी मुख्य कालव्यात सोडण्यात आले आहे.

सोडण्यात आलेले पाणी सुरुवातीला कालवा कि.मी. ० ते २० पर्यंत दिले जाईल. तसेच पाण्याचा एकूण वापर लक्षात घेता टप्प्याटप्प्याने एकूण ११ पंप सुरू केले जातील. प्रत्येक पोटकालव्यांवरील शेवटच्या शेतकऱ्याला भरपूर पाणी मिळेपर्यंत पाणी सुरुच राहिल. शिवाय हे पाणी कालव्याच्या शेवटपर्यंत कि.मी.१४४ पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न आहे.

ऐन उन्हाळ्यातील या पाण्याचा लाभ बारमाही बागाईत शेतीसह वाढीव उन्हाळी पिकांना होणार आहे. शिवाय कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यांतील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा पाणीप्रश्न मिटणार असल्याने लोकांतून आनंद व्यक्त होत आहे.

वांगी : ‘ताकारी’ योजनेचे तिसरे पाणीआवर्तन सुरू. यावेळी १४४ कि.मी.पाणी नेण्यासाठी यंत्रणा सज्ज, कार्यकारी अभियंता राजन डवरी यांची माहिती, तीन तालुक्यांतील शेतीला मिळणार दिलासा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com