आता सर्व गावांत सॅनिटरी नॅपकिन डिस्पोझल मशिन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

जागतिक बॅंकेने दिले सातारा जिल्हा परिषदेला एक कोटी चार लाखांचे अनुदान.

सातारा  : सॅनिटरी नॅपकिन मागतानाही ते हळू आवाजात मागणे... कागदात लपेटून नेणे... असे अजूनही घडतेच आहे. शिवाय, त्याची विल्हेवाट लावणे तर अत्यंत अडचणीचे ठरते. ही समस्या सोडविण्यासाठी जागतिक बॅंकेने पुढाकार घेतला असून, सातारा जिल्हा परिषदेला एक कोटी चार लाखांचे अनुदान दिले आहे. त्यातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत सॅनिटरी नॅपकिन डिस्पोझल मशिन बसले जातील. 

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत ई-टेंडर काढून त्यातून इलेक्‍ट्रिक टाइप सॅनिटरी नॅपकिन डिस्पोझल मशिन घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. जागतिक बॅंकेकडून मिळालेल्या अनुदानातून जिल्ह्यातील एक हजार 490 ग्रामपंचायतींना प्रत्येकी सात हजार रुपयांचे मशिन देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 
या मशिन प्राधान्याने गावामधील माध्यमिक विद्यालये अथवा मोठ्या शाळांमध्ये किंवा हे दोन्ही नसेल तर ग्रामपंचायत महिलांच्या सोयीनुसार बसविणार आहे. इलेक्‍ट्रिक मशिन खरेदी केली जाणार असल्याने त्यापासून प्रदूषणही होणार नाही. संबंधित ठेकेदाराकडून काही कालावधीसाठी देखभाल, दुरुस्तीची तरतूद केली जाणार आहे. दोन ऑक्‍टोबरपर्यंत बहुतांश गावांत या मशिन बसविण्यासाठी स्वच्छता विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitary napkin disposable machine in all villages now