‘संजय यांना सोबत घेऊन जायचे आहे’

‘संजय यांना सोबत घेऊन जायचे आहे’

कोल्हापूर - ‘संजय’ यांना सोबत घेऊन जायचे आहे, हे वाक्‍य खूप काही सांगून जाते. आता संजय कोण? तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, त्यांना सतेज पाटील सोबत घेऊन जाणार हेही उघड आहे. प्रा. मंडलिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त दोघेही काल एकत्रित होते. प्रा. मंडलिक चंदगडचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी कोल्हापुरात आले. महाडिकांना अडचणीत आणायचे असेल, तर प्रा. मंडलिक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवावी लागेल, हे पाटील यांना माहीतच आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत अमल महाडिक यांचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पत्ता कट करण्यासाठी पाटील हे थेट मंडलिक यांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळी ते राज्याच्या सत्तेत होते. नंतर मंडलिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 

दरम्यानच्या काळात राजकारणाची सूत्रे फिरली. कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांचा आमदार अमल महाडिक यांनी पराभव केला. अमल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, तर त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक या यावेळेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या आणि महाडिक यांनी हिशेब चुकता केला.

खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आशीर्वाद आणि जनतेची साथ असेल तर निश्‍चित निवडून येऊ, असे ते सांगतात.

प्रा. मंडलिक शिवसेनेचे संभाव्य उमेदवार समजले जातात. शिवसेना-भाजपची युती झाली आहे. युतीमुळे मतविभागणी टळणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आजही मोठा आहे. उमेदवार कोण आहे, यापेक्षा धनुष्यबाण चिन्हाला मत देणारा एका वर्ग आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा होता, मात्र त्यापेक्षा धनंजय महाडिक यांनी गेल्या दहा वर्षात जे कष्ट घेतले. त्याचाही मोठा वाटा होता.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात प्रा. मंडलिक यांनी पावणेसहा लाखांवर मते मिळाली. इतक्‍या मोठ्या संख्येने मते पडलीच कशी, असा प्रश्‍न महाडिक यांनाही पडला. 
अर्थात अजूनही कोणत्या उमेदवाराला तिकीट जाहीर झालेले नाही. अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही हालचाली होऊ शकतात.

राजकीय गणित
युतीमुळे थेट संजय यांना सोबत घेऊन जायचे आहे, हे वाक्‍य गंमतीने बोलले जात असले तरी त्यात फार मोठी राजकीय गणित दडले आहे. आपले स्वतःचे असे एक मतांचे पॉकेट आहे. ते मंडलिक यांच्या पदरात टाकण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com