ते बेळगावात आले ; युद्ध अन्‌ तहातही जिंकले... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 January 2020

प्रकट मुलाखतीवेळी खासदार राऊत यांनी सीमाप्रश्‍न व मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत अधिक प्रमाणात भाष्य करण्याचे टाळले; मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना विविध गोष्टींचा उलगडा केला.

बेळगाव - सार्वजनिक वाचनालयातर्फे बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे उद्‌घाटन व प्रकट मुलाखतीसाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत शनिवारी (ता. 18) बेळगावात आले होते. प्रकट मुलाखतीवेळी खासदार राऊत यांनी सीमाप्रश्‍न व मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत अधिक प्रमाणात भाष्य करण्याचे टाळले; मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना विविध गोष्टींचा उलगडा केला. दरम्यान, खासदार राऊत कर्नाटकी दडपशाही झुगारुन बेळगावात आलेच; पण म. ए. समिती नेत्यांना अनेक सूचना केल्या. त्यामुळे खासदार राऊत "युद्धात अन्‌ तहातही जिंकले' अशी चर्चा मराठी भाषिकांतून सुरु आहे. 

युवकांची ताकद वाढविण्याचा सल्ला

सीमाप्रश्‍नी युवकांना महाराष्ट्र सरकार आवश्‍यक ते पाठबळ देणार आहे, असे सांगत युवकांची ताकद वाढविण्याचा सल्ला खासदार राऊत यांनी दिला. त्यामुळे खासदार राऊत काहीच बोलले नाहीत, अशी कोल्हेकुई करणाऱ्या कानडी संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना चपराक बसली आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमासाठी बेळगावात येणाऱ्या खासदार राऊत यांना अडविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. सांबरा विमानतळावर दाखल झाल्यापासून खासदार राऊत यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत भाष्य करु नये, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांकडून केल्या जात होत्या. खासदार राऊत गोगटे रंगमंदिर येथे दाखल होताच संयुक्‍त महाराष्ट्राच्या घोषनांनी परिसर दणाणून सोडला. मात्र या ठिकाणी घोषणा देणाऱ्या मराठी भाषिकांवर दमदाटी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला. त्यामुळे कार्यक्रमावेळी खासदार राऊत यांची तोफ धडालली नाही. परंतु, कार्यक्रमानंतर हॉटेलमध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आवश्‍यक त्या सूचना त्यांनी केल्या. तसेच काही कागदपत्रेही मागवून घेतली. 

वाचा - सिमावाशीयांनी शरद पवारांकडे केल्या या मागण्या... 

युवा समितीचे शुभम शेळके, श्रीकांत कदम, धनंजय पाटील यांच्याशी चर्चा करताना सीमाप्रश्‍नी युवकांनी पुढे येण्याची गरज व्यक्‍त केली. युवा समितीतर्फे हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती आहे. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांनी कधीही हाक द्यावी, आपण बेळगावात दाखल होऊ, असे खासदार राऊत यांनी आश्‍वासन दिले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनुरी आदींनीही खासदार राऊत यांच्याशी सीमाप्रश्‍न व संघटना वाढीबाबत चर्चा केली. आगामी काळात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत राज्यसभेत आवाज उठविण्याबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अन्यायाबाबत माहिती देणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात सीमाप्रश्‍नी आश्‍वासक पावले उचलली जातील, अशी आशा मराठी भाषिकांतून व्यक्‍त केली जात आहे. 

अन्यायाची जाणीव; पावले उचलू 

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, सुनील आनंदाचे यांच्याशी चर्चा करताना खासदार राऊत यांनी, सीमाभागात सुरु असलेल्या अन्यायाबाबत आपल्याला जाणीव आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार आवश्‍यक ती पावले उचलेल, असे सांगत दिलासा दिला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut discusses with members of Maharashtra Integration Committee

टॉपिकस
Topic Tags: