सर्पदंश मृत्यूप्रकरणी सीपीआरसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

कोल्हापूर - सर्पदंश झालेल्या प्रताप पुणेकर यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. असा आरोप करत आज गिरगाव ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सीपीआर रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. 

कोल्हापूर - सर्पदंश झालेल्या प्रताप पुणेकर यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. असा आरोप करत आज गिरगाव ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सीपीआर रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. 

मोर्चाची सुरुवात दसरा चौक येथून झाली. आंदोलकांनी सीपीआरच्या मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी साप असो वा ताप होऊ देऊ नका कोणाचा प्रताप, अशा घोषणा देण्यात आल्या. 

अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आठ दिवसात कारवाई न झाल्यास सीपीआरसमोर उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

गिरगाव ( ता करवीर) येथील प्रताप निवास पुणेकर या युवकाला शेतात काम करत असताना आठ जुलै रोजी सर्पदंश झाला होता. त्यांच्यासह तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांना सीपीआर येथे दाखल केले. मात्र व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना खासगी दवाखान्यात हलविण्यास सांगितले. गुरुवारी प्रतापचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीपीआरमध्ये उपचारात वेळकाढूपणा केल्यानेच प्रतापचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

वेळकाढूपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह सुरक्षारक्षकांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक मागणीवर ठाम राहिले. अखेर अधिष्ठाता डॉ अजित लोकरे यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले.

यावेळी आंदोलकांनी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रताप व उपचारात वेळकाढूपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, किमान व्हेंटिलेटरवर उपलब्ध करण्यास अन्य मागण्या निवेदनाद्वारे केल्या. यावेळी डॉ. लोकरे यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी नमती भूमिका घेतली. मात्र आठ दिवसात कारवाई न झाल्यास सीपीआरसमोर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, युवराज शिंदे, संभाजी साळुंखे, सुरेश पाटील, दिलीप जाधव, आशिष नावलकर, भगवान कोइगडे, अमित कांबळे, विनोद चव्हाण, संभाजी जाधव उपस्थित होते.

साप केला जप्त
आंदोलकांनी आपल्यासोबत जीवंत साप ही आणला होता. सीपीआर इमारतीत तो सोडण्याची तयारी यातील काहींनी केली होती. मात्र याची कुणकुण लागताच पोलिसांनी आंदोलकांची झाडाझडती घेत पोत्यातून आणलेला साप जप्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanke Bite case Sambhaji Briged agitation in CPR