रांगोळीतून साकारले संत बाळूमामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

आदमापुरात रांगोळी प्रदर्शन : कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

आदमापुरात रांगोळी प्रदर्शन : कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

गारगोटी - कोल्हापूर येथील कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी रांगोळीतून संत बाळूमामांचे जीवन रेखाटले आहे. हुबेहूब चित्रासारखी दिसणारी ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत आहे.
आदमापूर येथील देवस्थानच्या मंगल कार्यालयात कलानिकेतनतर्फे आयोजित रांगोळी प्रदर्शनात कलाकारांनी ही कलाकृती रेखाटली आहे. 31 ऑक्‍टोंबरपर्यंत हे प्रदर्शन होईल.
देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष राजाराम मगदूम पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. रा. शि. गोसावी कलानिकेतन विद्यालयातील ए.टी.डी.च्या विद्यार्थ्यांनी रांगोळीचे रेखाटन केले. सुमारे 17 बाय 25 फुटांच्या भव्य रांगोळी कलाकृतीतून संत बाळूमामांचे समग्र चरित्र मांडले आहे. सद्‌गुरू बाळूमांमाची मानवतेची शिकवण व प्राणीमात्रांविषयी असणारी अपार करुणेची भावना या रांगोळीतून प्रकट होते.

विद्यार्थी अशांत मोरे, योगेश सुतार, संतोष कांबळे, सुहास घोरपडे, सौरभ जाधव, अनिकेत बारड, अपर्णा निकम, शिवानी पाटील, पूजा पांडगळे, ऋतुराज पार्लेकर, अनिकेत बामणकर, शुभम कुरणे, अतुल कापडे, मृणाल आमते, रोहिणी पाटील यांनी परिश्रम घेतले. त्यांना प्राचार्य सुरेश पोतदार, प्रा. वैशाली पाटील, प्रा. संदीप पोपेरे यांचे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे, संचालक सतीश पाटील, विजय टिपुगडे, अमृत पाटील, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Sant Balumama created in Rangoli