मोदी देशाच्या सुरक्षिततेशी खेळताहेत : फौजीया खान 

मोदी देशाच्या सुरक्षिततेशी खेळताहेत : फौजीया खान 

सांगली - राफेल घोटाळा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी केला. संविधान बचाव सभेत त्या बोलत होत्या. आमदार विद्या चव्हाण, सुमन पाटील यावेळी उपस्थित होत्या. 

जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती खान यांनी फडणवीस व मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, मोदी यांनी पंधरा दिवसांपुर्वी स्थापन झालेल्या अंबानींच्या कंपनीला राफेलचे कंत्राट दिले. देशाच्या सुरक्षेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले. हा देशद्रोहच आहे. महागाई वाढली, नोकऱ्या संपल्या. तरुण आत्महत्या करताहेत. महिला असुरक्षित आहेत. सर्वाधिक असुरक्षित देश म्हणून भारत ओळखला जातोय. कोल्हापुरात पोलिसांनी आमच्याकडून मनुस्मृती हिसकावली. सरकारला संविधानाऐवजी मनुवाद पाहीजे. पोलिसांच्या दादागिरीतून मनुवाद वाढवला जातोय. हे चालू देणार नाही. दुसऱ्या स्वातंत्र्यसंग्रामाची वेळ आलीय. 

आमदार चव्हाण म्हणाल्या, मोदींची हिटलरशाही फार चालणार नाही. घटनेने आम्हाला अधिकार दिलेत. गप्प बसणार नाही. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींसारख्या विचारवंतांचे खून होताहेत. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन बॉम्बचे साठे पकडले. मराठा आंदोलनाला बॉम्बस्फोटाद्वारे गालबोट लावण्याचे प्रयत्न उधळले. फडणवीसांना जाब विचारावा लागेल. खाने नही दुँगा म्हणणाऱ्या मोदी सरकारचे अंबानी व अदानी हे दोन हात झालेत. मोदींना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इव्हीएम यंत्राद्वारे लोकशाहीचा खूून केला जातोय. लोकशाही वाचवण्यासाठी इव्हीएम हटाव असा आमचा नारा आहे. 

यावेळी प्रदेश सचिव राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे यांचीही भाषणे झाली. प्रदेश कार्यकारीणीच्या मीना खरे, सोनाली देशमुख, छाया जुगळे, आशा भिसे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, शरद लाड, विनया पाठक आदी उपस्थित होते. 

पोलिसाला हाकलले -
सभेचे छायाचित्रण करणाऱ्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला महिलांनी विरोध केला; सभेतून हाकलले. पोलिसांची दादागिरी चालणार नसल्याच्या घोषणा केल्या. घेराव घालून छायाचित्रण डिलीट करायला लावले. दहा मिनिटे गोंधळ सुरु होता. सभेनंतर फौजीया खान, विद्या चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात वीस मिनिटे ठिय्या मारला; घोषणाबाजी केली. सभेसाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com