सांगलीः सिद्धेवाडी सरपंचांना पाण्यासाठी पेटवून घेण्याची वेळ

रवींद्र माने
शनिवार, 20 जुलै 2019

मागेल त्याला टॅंकर द्या म्हणून मंत्री आदेश देतात, पण खाली यंत्रणा कुठे हलते? ऐन दुष्काळात पाण्याचे टॅंकर मिळावेत म्हणून मोर्चे काढून ही प्रशासनाने दाद दिली नव्हती तीच मानसिकता आजही कायम आहे.

तासगाव - सिद्धेवाडी येथील पाण्याचा टॅंकर मिळावा, म्हणून चक्क सरपंचांना रॉकेलचा कॅन घेऊन तहसीलदार कार्यालयात जावे लागते, यावरून शासकीय असंवेदनशीलता किती टोकाला गेली आहे? याचा उत्तम नमुना पहावयास मिळाला. पिण्याचे पाणी न मिळू देण्याच्या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेला सलामच केला पाहिजे. तलाठ्याच्या सहीलाच दहा दिवस लागले, आता राजानं मारल्यावर विचारायचं कोणाला ? आता तरी अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.

मागेल त्याला टॅंकर द्या म्हणून मंत्री आदेश देतात, पण खाली यंत्रणा कुठे हलते? ऐन दुष्काळात पाण्याचे टॅंकर मिळावेत म्हणून मोर्चे काढून ही प्रशासनाने दाद दिली नव्हती तीच मानसिकता आजही कायम आहे.

सिद्धेवाडी या तलावाकाठच्या गावात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष!  वर पडणाऱ्या पावसाने विहिरी, कूपनलिकांना पाणी नाही. अशा परिस्थितीत पाण्याचा टॅंकर मिळावा म्हणून मागणी करूनही पाण्याचा टॅंकर मिळत नाही. हे पाहून सरपंच जंगम यांनी चक्क अंगावर रॉकेल ओतून घेण्याची तयारी दाखवली. पाण्याचे टॅंकर बाबतीत प्रशासनाची कायम नकारात्मक मानसिकता का हा प्रश्नच आहे.  

ग्रामपंचायतीच्या टॅंकर मागणीच्या प्रस्तावावर तलाठी दहा दिवस सही होत नाही तलाठ्याने सही करावी म्हणून मनधरण्या कराव्या लागतात. इतकी कसली नकारात्मक मानसिकता? अशा आण्णासाहेबांचे करायचे काय? मुळात अण्णासाहेब मंडळी त्या त्या गावात राहतच नाहीत. त्यामुळे दहा दिवस पाणी न मिळण्याचा अनुभव त्यांना येतच नाही. एकच ग्रामपंचायतीला असा अनुभव येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल ?  त्या सरपंचांचे सुदैव की प्रशासनाने त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला नाही, हेही नसे थोडके! 

आमदारावरही उपोषणाची वेळ
हाच अनुभव अन्य काही गावातील सरपंच पदाधिकाऱ्यांना आला आहे. तालुक्‍यात दुष्काळ जाहीर होऊन ही टॅंकर सुरू व्हावेत यासाठी मोर्चे आंदोलने करावी लागली. खुद्द आमदारांनी धरणे धरूनही कागदी घोडे वाचवण्याचे काम प्रशासनाने केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch suicide attempt for water tanker