Corona Virus : बापरे ! महाराष्ट्रात सातारा सोळाव्या क्रमांकावर

सरकारनामा ब्यूरो
Saturday, 25 April 2020

एकाच दिवशी तब्बल एक डझन रुग्ण सापडल्याने प्रशासनही खडबडुन जागे झाले आहे. तालुक्यात कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्याने लोकांच्या मनात भितीचे काहूर माजू लागले आहे.

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात कोरोनाचे सावट अधिक गडद होऊ लागले आहे. आज दिवसभरात तालुक्यात कोरोनाचे तब्बल 12 रूग्ण वाढल्याने झाल्याने जिल्ह्यासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. आज सापडलेल्या 12 बाधितांमुळे कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 वर पोहचली आहे. सातारा जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या ३३ झाली आहे. या वाढलेल्या रूग्णांमुळे सातारा जिल्हा कोरोनाबाधित शहरात राज्यात १६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

आज दिवसभरात वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी दुपारपासून कऱ्हाड येथे तळ ठोकला आहे. 

हेही वाचा ः दोन मृत्यू, दोन हॉस्पिटल; हलगर्जीपणा कुणी केला?

सातारा जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. 24) कोरोनाबाधितांची संख्या 21 होती. त्यात 11 रूग्ण कऱ्हाड तालुक्यातील होते. आज शनिवारी सकाळच्या टप्प्यात त्यात पाचने वाढ झाली. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या 16 वर तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या 26 वर पोहोचली आहे. वनवासमाची येथील एकाच कुटुंबातील चार व मलकापूर येथील बाधिताचा त्यात समावेश होता. त्यामुळे सकाळपासूनच तालुक्यात चिंतेचे व भितीचे वातावरण होते.

आवश्य वाचा ः ए भावा...चल घेऊ पुढाकार आपल्या साताऱ्यासाठी

दुपारनंतर त्यात आणखी भर पडली. दुपारच्या सत्रात आणखी सात जणांचे रिपार्ट पॉझिटिव्ह आल्याने कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या 23 वर पोहोचली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३ झाली आहे. यात कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर, वनवासमाची, रेठरे बुद्रक, कापील, कामेरी व येतगावधील  (जि.सांगली) बाधितांचा समावेश आहे. एकाच दिवशी तब्बल एक डझन रुग्ण सापडल्याने प्रशासनही खडबडुन जागे झाले आहे. तालुक्यात कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्याने लोकांच्या मनात भितीचे काहूर माजू लागले आहे.

 

संबंधित गावे लॉकडाऊन करण्यासाठी प्रशासकीय व पोलिस यंत्रणा त्या गावात दाखल झाली आहे. त्यांनी ती गावे सील करण्यासह संबंधितांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दुपारनंतर कऱ्हाडकडे धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचे काम सुरू होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara : 31 Corona Virus Infected patients