आरर...महसूल, पाेलिसांचा असाही विक्रम

संजय शिंदे t@ssanjaysakaal
शनिवार, 11 जानेवारी 2020

लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. 1064 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह दूरध्वनी 02162-238139 येथे संपर्क साधावा तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता. 

सातारा ः सातारा लाचलुचपत विभागाने गेल्या वर्षात सापळे रचून 36 लाचखोरांना अटक केली आहे. त्यामध्ये महसूल विभागाने "नंबर वन' मिळवला असून, पोलिस विभागाने दुसरा क्रमांक मिळवत लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे दोन "क्‍लास वन ' अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
 
सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामध्ये महसूल विभाग आघाडीवर असून, पोलिस विभाग दुसऱ्या स्थानी आहे. महसूल विभागातील सर्वाधिक नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्या खालोखाल पोलिस विभागातील पाच जणांना अटक केली आहे. 

वन विभाग व भूमिअभिलेख (मोजणी) विभागातील प्रत्येकी दोघांना अटक करण्यात आली आहे. ग्रामविकास विभाग (जिल्हा परिषद), विधी व न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग (पंचायत समिती), अन्न व औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, जलसंपदा विभाग, सामाजिक न्याय विभाग व वित्त विभागाच्या प्रत्येकी एकावर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या 27 कारवायांत 36 जण जाळ्यात अडकले आहेत.

हेही वाचा - कल्याणोत्सवाने नटराज रथोत्सवाची सांगता
 
"क्‍लास थ्री'मधील लोकसेवकांचे लाचखोरीत प्रमाण जास्त असून, 26 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एका "क्‍लास टू' अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. क्‍लास वन अधिकाऱ्यांवर कारवाई कमी होत असल्याची तक्रार असते. पण, गेल्या वर्षी दोन "क्‍लास वन' अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. खासगी सहा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका वकिलावरही कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा -  शिक्षक कंटाळले गटबाजीला ; लढाई सुरुच ठेवणार

प्रत्येक सरकारी कार्यालयात एखाद्या कामासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करूनही अनेक लहान-मोठे सरकारी अधिकारी कामासाठी पैशाची मागणी करतात. भ्रष्टाचार करण्यात महसूल विभागाने प्रथम क्रमांक मिळवला असून, खाकी वर्दीने दुसरा क्रमांक मिळवला आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा कारवाईचा टक्का थोडा कमी झाला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. यंदा जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच महसूल व पोलिसांवर प्रत्येकी एक कारवाई झाली आहे.

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नागरिकांचा विश्‍वास वाढला आहे. शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करीत असेल तर तत्काळ तक्रार करा. 
अशोक शिर्के, पोलिस उपअधीक्षक, सातारा, एसीबी 

तक्रारीसाठी साधा संपर्क 

लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. 1064 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह दूरध्वनी 02162-238139 येथे संपर्क साधावा तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता. 

नक्की वाचा -  हे केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

लाचखोर अधिकाऱ्यांवरील कारवाई वर्ष 2019

क्‍लास वन 
02
क्‍लास टू 
01
क्‍लास थ्री 
26
क्‍लास फोर 
01

गेल्या काही वर्षातील कारवाईची माहिती 

2016 -  28 
2017 - 29 
2018 - 29
2019 - 27
2020 - 02

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Satara Bribery Department Arrested Bureaucrats From Revenue And Police Department