सातारा जिल्ह्यातून मूळ गावी जायचंय ? माेफत रेल्वे प्रवासास काँग्रेसचा 'हात'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका घेऊन मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्यासाठी संबंधित राज्यातील प्रदेश कॉंग्रेस पक्ष मजुरांच्या रेल्वे प्रवासभाड्याचा खर्च करेल, असा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. श्री.थोरात यांच्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील परप्रांतीयांचा खर्च कॉंग्रेस पक्ष करणार आहे. 
 

पुसेगाव (जि.सातारा)  : परराज्यातील आपापल्या गावी रेल्वेने जाऊ इच्छिणाऱ्या सातारा जिल्ह्यातील मजुरांचा खर्च कॉंग्रेस पक्ष करणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. केंद्र सरकारने केवळ चार तासांची मुदत देऊन लॉकडाउन जाहीर केल्यामुळे मजूर आपापल्या गावी जाऊ शकले नाहीत. त्यातील काहीजण 800 ते एक हजार किलोमीटरची पायपीट करत आपल्या गावी गेले. त्यामुळे लहान मुले व महिलांचे अतोनात हाल झाले. 1947 च्या भारत-पाक फाळणीनंतर प्रथमच असे विदारक चित्र देशात पाहावयास मिळाले, असे डाॅ. जाधव यांनी नमूद केले.

डॉ. जाधव म्हणाले, आजही लाखो मजूर देशाच्या अनेक भागात अडकून पडले आहेत. गैरसोयीमुळे त्यांना आपापल्या गावी जायचे आहे. त्यांच्याजवळ प्रवासाइतपतही पैसे नसल्याने ते संकटात सापडले असताना भारत सरकार व रेल्वे मंत्रालय त्यांच्याकडून रेल्वेभाड्याची आकारणी होत आहे, हे दुर्दैवी आहे. परदेशी अडकलेल्या आपल्या नागरिकांना आपण आपले कर्तव्य म्हणून विशेष विमानाने मायदेशी आणण्याची मोफत सोय केली. गुजरातमधील एका कार्यक्रमाच्या भोजन व प्रवासासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले. रेल्वे मंत्रालय जर प्रधानमंत्री केअर फंडाला 151 कोटी रुपये देणगी देऊ शकते, तर देशाच्या विकासात ज्यांचे योगदान आहे, अशा गरीब मजुरांना मोफत रेल्वेची सुविधा का देऊ शकत नाही? त्या मजुरांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी कॉंग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली. परंतु, केंद्र शासन अथवा रेल्वे मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले नाही.

त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका घेऊन मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्यासाठी संबंधित राज्यातील प्रदेश कॉंग्रेस पक्ष मजुरांच्या रेल्वे प्रवासभाड्याचा खर्च करेल, असा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. श्री.थोरात यांच्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील परप्रांतीयांचा खर्च कॉंग्रेस पक्ष करणार आहे. 

...येथे साधा संपर्क
 
या जिल्ह्यातून आपापल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांनी आपली नोंदणी संबंधित गावातील तलाठ्यांमार्फत प्रत्येक तालुक्‍याच्या तहसील कार्यालयात करावी. संबंधित याद्यांप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून परप्रांतीयांची रेल्वेने जाण्याची सोय करता येईल. तेव्हा संबंधितांनी त्वरित नोंद करावी. काही अडचण असल्यास कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी (9595529237, 9890099933) या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. 

चिंताजनक ! कोरोनानंतर आता सारीने दाेघांचा मृत्यू

बाप रे ! हे काय चाललंय सातारा जिल्ह्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Congress Will Pay Train Ticket Of Migrants