esakal | Video : जे तमिळनाडूने केले तेच महाराष्ट्र सरकारनेही करावे
sakal

बोलून बातमी शोधा

Video : जे तमिळनाडूने केले तेच महाराष्ट्र सरकारनेही करावे

बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारे परराज्यांतील मजूरही लॉकडाउनमध्ये अडकले होते. सध्या त्या परराज्यातील लोकांना त्यांच्या गावी पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यात अनेक बांधकाम मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे कुशल मजूर परराज्यात गावी परतल्याने बांधकाम व्यवसायात यापुढे काही दिवस कुशल मजुरांची कमतरता भासणार आहे.

Video : जे तमिळनाडूने केले तेच महाराष्ट्र सरकारनेही करावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः नोटाबंदी, जीएसटी, रेरा कायदा आदी आव्हानांना सामोरे जात सावरत असणारा बांधकाम व्यवसाय कोरोनाच्या संकटात आणखी अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. लॉकडाउनमध्ये बांधकाम व्यवसायाला सशर्त परवानगी मिळाली असली तरी सिमेंट व स्टीलची कृत्रिम दरवाढ तसेच परराज्यांतील मजुरांनी गावाकडे परतीची वाट धरल्याने बांधकाम व्यवसाय पूर्णतः अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह त्यावर अवलंबून असणारे व्यापारीही चिंतेत आहेत. 

देशात कृषी क्षेत्रापाठोपाठ सर्वाधिक अर्थचक्रे फिरण्याचे क्षेत्र म्हणून बांधकाम व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, हा व्यवसाय गेल्या पाच वर्षांपासून आव्हानांना सामोरे जात आहे. नोटाबंदी, जीएसटी व त्यानंतर आलेल्या रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायासमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यातूनही हा व्यवसाय सावरत असताना कोरोना संसर्गाचे संकट उभे राहिले. राज्यात 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर आधारित सर्व आर्थिक चक्रे पूर्णतः थांबली. त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.
 
लॉकडाउनच्या काळात बांधकामे ठप्प असल्याने सिमेंट, स्टीलला अजिबात मागणी नव्हती. मात्र, शासनाने काही अटींवर बांधकाम व्यवसायाला सध्या परवानगी दिली आहे. मात्र, लॉकडाउनपूर्वी सिमेंटचा प्रति पोत्यामागे 280 ते 300 रुपये असलेला दर आज 380 ते 400 रुपयांपर्यंत गेलेला आहे. स्टीलच्या दरातही प्रति किलोमागे दीड ते दोन रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात येते. सिमेंट उत्पादनाचे कारखाने सोलापूर जिल्ह्यात असल्याने व सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने तेथील सिमेंट उत्पादनावर मर्यादा आल्याने सिमेंटची प्रति पोत्यामागे 70 ते 100 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही दरवाढ कृत्रिम असल्याचे सांगण्यात येते. स्टीलच्या बाबतीतही वितरकांकडून उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असेल, तरच स्टीलचा लोड मिळणार असून, तो उतरवून घ्यायची जबाबदारी संबंधितांवर आहे. त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे. यामध्ये सिमेंट व स्टीलचे किरकोळ वितरक व विक्रेतेही भरडले जात आहेत. दरम्यान, बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारे परराज्यांतील मजूरही लॉकडाउनमध्ये अडकले होते. सध्या त्या परराज्यातील लोकांना त्यांच्या गावी पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यात अनेक बांधकाम मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे कुशल मजूर परराज्यात गावी परतल्याने बांधकाम व्यवसायात यापुढे काही दिवस कुशल मजुरांची कमतरता भासणार आहे. स्थानिकांना घेऊन काम करावे लागणार आहे. त्याचाही बांधकाम व्यवसायाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. वाढलेले सिमेंट आणि स्टीलचे दर पाहता घरांच्या किमतीही वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घर मिळण्यास अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारने तमिळनाडूच्या धर्तीवर नवीन खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटीत सूट देण्याची कल्पना राबवल्यास बांधकाम क्षेत्रातील अर्थिक चक्रे गतिमान होण्यास मदत होईल, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

...असे आहेत दर 
लॉकडाउनपूर्वी  : सिमेंट (प्रति बॅग) 280 ते 300 रुपये. लॉकडाउननंतर : 380 ते 400 रुपये.
लॉकडाउनपूर्वी  : स्टील (प्रति किलो) 42 ते 43 रुपये. लॉकडाउननंतर :44 ते 45 रुपये. 

 

नोटाबंदी, जीएसटी, रेरा कायद्यापाठोपाठ कोविड-19 चे संकट बांधकाम व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. सध्या बांधकामांना सशर्त परवानगी मिळाली असली तरी स्टील व सिमेंटची झालेली कृत्रिम दरवाढ तसेच परराज्यांतील मजूर गावी परतल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांधकामावरील वाढणाऱ्या खर्चामुळे ग्राहकांना घराच्या किमती परवडणाऱ्या दरात देणे अडचणीचे ठरेल. 
-धनंजय कदम, अध्यक्ष, क्रेडाई, कऱ्हाड शाखा 

आता तरी थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करा : पृथ्वीराज चव्हाण

...म्हणून अभियंत्यांनी आपले जीवन संपवले

दारू दुकाने सुरु करण्यापुर्वी हे करा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

चिंताजनक : खटाव पाठाेपाठ माणमध्येही कोरोनाची धडक; कऱ्हाड नव्वदीत

 

loading image
go to top