सातारा जिल्ह्यातील १२४ छावण्यांत ७२ हजार जनावरे

विकास जाधव
सोमवार, 15 जुलै 2019

शेळ्या- मेंढ्याची पहिली छावणी माण तालुक्‍यात
दुष्काळात चारा व पाण्यासाठी गाई, म्हशीसारख्या जनावरांना छावणी पर्याय उपलब्ध असल्यामुळे शेतकरी छावणीत जनावरे घेऊन जातात. मात्र, शेळ्या- मेंढ्या हा पर्याय उपलब्ध नसल्याने स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. म्हणून शेळ्या- मेढ्यांसाठी राज्य शासनाने राज्यातील पहिली चारा छावणी पिंगळी बुद्रुक येथे सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात शेळ्या- मेंढ्यासाठी तीन छावण्या मंजूर असून, यामध्ये दोन चारा छावण्या सुरू आहेत. या दोन चारा छावण्यांत ७९१ शेळ्या, ३६४ मेंढ्या असे एकूण शेळ्या- मेंढ्या दाखल झाल्या आहेत.

काशीळ - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून १२४ चारा छावण्या सुरू असून, यामध्ये ७२ हजार ६६९ लहान- मोठी जनावरांची उपजीविका सुरू आहे. 

जिल्ह्यात दोन्ही टोकात मोठी तफावत झाली असल्याचे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा, कऱ्हाड या तालुक्‍यांत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शेतात पाणी साचल्याबरोबर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या पावसामुळे शेतकरी कामे ठप्प झाली आहेत. याऊलट जिल्ह्याच्या पूर्व भागात परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे दमदार आगमन न झाल्याने पाण्याअभावी सर्व कामे ठप्प झाली आहेत. चारा व पाण्यावाचून जनावंराचे उपासमार होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यामुळे इतर सर्व कामे सोडून त्याच्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे, अशा जनावरांसाठी छावणीत आश्रय घेऊन राहात आहेत. शासनाने सुरू केलेल्या छावण्यांत दिवसेदिवस शेतकऱ्यांची वाढू लागली आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण या तीन तालुक्‍यांत १२४ चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये नऊ हजार ५७७ लहान, ६३ हजार ९२ मोठी अशा एकूण ७२ हजार ६६९ जनावरांचा समावेश आहे. माण तालुक्‍यात सर्वाधिक लहान व मोठी अशी ५८ हजार ८११ जनावरे आहेत. त्यानंतर खटाव तालुक्‍यात २१ चारा छावण्यांत एक हजार १४७ लहान, तर सहा हजार ७१९ मोठी, फलटण तालुक्‍यात १२ चारा छावण्यांत ७७४ लहान व पाच हजार २१९ मोठी अशी एकूण पाच हजार ९९३ जनावरे छावणीत उपस्थिती आहे.

पश्‍चिमेकडे जोरदार पाऊस सुरू असतानाही अजूनही या तीन तालुक्‍यांत अपेक्षित पावसाची हजेरी लागलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना छावण्यांशिवाय पर्याय नसल्यामुळे जनावरांची संख्या वाढतच आहे. पाऊस पडल्याशिवाय जनावरे घरी नेता येणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे पाऊस पडला नाही तर शासनास जनावरे जगविण्यासाठी चारा छावणीच्या मुदतीत वाढ करावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Fodder Depo Cattle