साताऱ्यात वाहनचालक बुचकळ्यात

सातारा - ‘पीडब्ल्यूडी’ कार्यालयानजीक मार्गदर्शक फलक नसल्याने वाहनधारकांचा उडणारा गोंधळ.
सातारा - ‘पीडब्ल्यूडी’ कार्यालयानजीक मार्गदर्शक फलक नसल्याने वाहनधारकांचा उडणारा गोंधळ.

सातारा - येथील पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने साताऱ्यात वाहने चालविणे म्हणजे जिकिरीचे झाले आहे. त्यातच काम सुरू असलेल्या ठिकाणी मार्गदर्शक वा सूचना फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. काही ठिकाणी फलक असले तरी ते नजरेसच पडत नसल्याने अनेक जण बुचकळ्यात पडत आहेत. 

सातारा शहराच्या वैभवात भर टाकणारा व आठ रस्ते एकत्रित आलेल्या पोवई नाक्‍यावरील वाहतूक सुरळीत करणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम गतीने सुरू आहे. त्यासाठी कऱ्हाड, कोरेगाव रस्त्यावरील, पोस्ट, बीएसएनएल कार्यालयाच्या बाजूकडील, तसेच पारंगे चौक, जिल्हा रुग्णालय, कर्मवीर पथ, राजपथ हेही मार्ग पोवई नाक्‍याकडे येण्यासाठी बंद केले आहेत. बस स्थानक मार्ग तहसील कार्यालयापासून पूर्णत: बंद आहे. वाहतूक थोपविण्यासाठी सर्वत्र बॅरिकेटस लावले आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांची दैना उडत आहे; पण वाहतूक बंद केलेल्या ठिकाणी मार्गदर्शक फलकांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे जेथे मार्ग बंद केले आहेत, अशा ठिकाणी वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार टी ॲण्ड टी कंपनी तसेच वाहतूक शाखेने समन्वय ठेवून अशा गोंधळ उडणाऱ्या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याची गरज आहे. काही ठिकाणी मार्ग दाखविणारे फलक कमी आकाराचे असल्याने ते निदर्शनास येत नाहीत. शिवाय, काही वाहनचालक ‘आंधळे’पणाने बिनदिक्‍कतपणे वाहने चालवत आहेत. त्यांना काही अंतर पुढे जाऊन पुन्हा मागे यावे लागते. त्यामुळे तेथेही मोठ्या आकारांचे फलक लावले पाहिजेत. 

होमगार्डनी नियमन करावे
वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीला पोवई नाक्‍यावर होमगार्ड तैनात केले आहेत. मात्र, बऱ्याचदा हे होमगार्ड पोलिस अथवा मित्रांसमवेत गप्पा मारताना आढळून येतात. त्यांनी वाहतूक नियमनावर भर दिल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वाहनचालक व्यक्‍त करत असतात.

समजेनात मार्ग
पंचायत समिती प्रवेशद्वार, फोडजाई देवी मंदिराशेजारी बस स्थानक, जिल्हा रुग्णालय, राजवाड्याकडे जाणारे मार्ग दाखविणारे फलक लावणे अत्यावश्‍यक आहेत. येथे कोणताच फलक न लावल्याने बाहेरून आलेले वाहनचालक गोंधळून जात आहेत. येथे वाहनांची गर्दीही होत असल्याने त्यांना कोणाला मार्ग विचारायचे असे प्रश्‍न पडत आहेत. वाहने थांबतात, तोपर्यंत मागून गर्दी होत असल्याने अधिकच वाहतूक कोंडी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com