Video : 'या'साठी उदयनराजे समर्थक आग्रही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

ग्रेड सेपरेटरचे तहसील कार्यालय ते सातारा पंचायत समितीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोवई नाका ते सायन्स कॉलेजपर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
 

सातारा : सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, छत्रपती शाहू महाराज चौक ते तहसील कार्यालय हा मार्ग येत्या 24 तारखेला सुरू करण्यात येणार आहे. या मार्गातील अंतर्गत विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करण्याची सातारकरांची इच्छा या महिनाअखेरीस पूर्ण होणार आहे.
 
पोवई नाक्‍यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन येथे येणाऱ्या तीन प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचा प्रकल्प माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी मंजूर करून आणला. या कामाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार आदींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात झाले होते. त्यानंतर संबंधित कंपनीने हे काम जोमाने सुरू केले. मध्यंतरीच्या काळात कामाची वेग कमी झाला होता. सुरवातीला 60 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, त्यानंतर या कामांत बदल झाल्याने त्याचे बजेट 75 कोटींवर गेले.

आता ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे, तसेच तहसील कार्यालय ते सातारा पंचायत समितीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोवई नाका ते सायन्स कॉलेजपर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा - Video : अन् जवानांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या
 
Video पहा : डॅशिंग उदयनराजेंचं हळवं रुप!

शाहू चौक ते तहसील कार्यालय ही लेन पूर्ण झाली असून, या लेनच्या विद्युतीकरण, अंतर्गत सजावट आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. येत्या 24 फेब्रुवारीला माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून ही एक लेन सुरू करण्याबाबत बांधकाम विभाग विचार करत आहे. त्यासाठी उदयनराजे समर्थकही आग्रही आहेत. त्यामुळे फेब्रुवारीअखेरीस सातारकरांना ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Grade Seprator Inaguration Will Be On 24 Feburary