महाशिवरात्रीदिनी ‘हर हर महादेव’चा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

सातारा - ‘हर हर महादेव’च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुलांबरोबरच आंब्याचा कोवळा मोहर अर्पण करत आज जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यवतेश्‍वरसह कोटेश्‍वर, काशी विश्‍वेश्‍वर अशा विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

महाशिवरात्रीनिमित्त आज फराळाच्या पदार्थांबरोबर फळांचीही मोठी उलाढाल झाली.

सातारा - ‘हर हर महादेव’च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुलांबरोबरच आंब्याचा कोवळा मोहर अर्पण करत आज जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यवतेश्‍वरसह कोटेश्‍वर, काशी विश्‍वेश्‍वर अशा विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

महाशिवरात्रीनिमित्त आज फराळाच्या पदार्थांबरोबर फळांचीही मोठी उलाढाल झाली.

महाशिवरात्रीनिमित्त काल विविध मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील कोटेश्‍वर मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आलेली होती. तेथे पहाटेपासून अभिषेक, पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. सकाळी सहापासूनच येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळीही दर्शनासाठी रांग लागलेली होती. 

येथून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर डोंगरावरील यवतेश्‍वर मंदिरात पहाटेपासून अभिषेक, पूजा, आरती, शिवनाम जप असे कार्यक्रम करण्यात आले. यवतेश्‍वर हे ठिकाण दाट झाडी, मोकळी हवा अशा निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने याठिकाणी पर्यटक आणि भाविकांची नेहमीच गर्दी असते. आज येथील प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. त्यात शाळा, महाविद्यालयांसह शासकीय सुटी असल्याने मंदिरातील भाविक व पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. खिंडीतील गणपती मंदिरानजीकच्या कुरणेश्‍वराचेही अनेकांनी दर्शन घेतले. क्षेत्र माहुली येथे कृष्णेत पवित्र स्नान करण्यासाठी, तसेच काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्याठिकाणी तर मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते. 

लिंब (ता. सातारा) येथे कृष्णेच्या पात्रात असलेल्या कोटेश्‍वर मंदिरात ग्रामस्थांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पूजा, अभिषेक, आरती, भजन या कार्यक्रमांबरोबरच शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करण्यात आले. याठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांतही भाविक सहभागी झाले होते. भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला. विविध मंदिरांत शिवलिलामृत पारायण, तसेच रात्री भजनाचे कार्यक्रम करण्यात आले.

फळांच्या मागणी व दरात वाढ 
कालपर्यंत केळी ३० रुपये डझनाने विकली जात होती, तर सफरचंद १२० रुपये किलो असा दर होता. महाशिवरात्रीच्या उपवासामुळे आज फळांच्या दरात विक्रेत्यांनी वाढ केली होती. कमी दर्जाची केळीही ४० ते ५० रुपये डझनाने काही ठिकाणी विकली जात होती, तर सफरचंदाचा दर १५० रुपये सांगितला जात होता. सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू आहे. द्राक्षांच्या दरात मात्र काहीही वाढ झाली नाही. ८० ते शंभर रुपये किलोने द्राक्षे विकली जात होती.

Web Title: satara mahashivratri