पाचगणीच्या दरीतून असा काढला मुंबईच्या महिलेचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

पाचगणीनजीक रविवारी (ता.12) हा अपघात झाला. आज (साेमवार) सकाळी विच्छेदन करून सना यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

भिलार (जि. सातारा) : पाचगणीहून वाईला जाणाऱ्या पसरणी घाटातील दांडेघर गावाच्या हद्दीतील हॅरिसन फॉली (थापा) वरून रविवारी (ता.12) रात्री दरीत कोसळलेल्या मोटारीतील पर्यटक महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मोटार मालक बचावला. 

पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की कुमेल बिलाल खतायू व सना कुमेल खतायू हे नागपाडा (मुंबई) येथील दांपत्य इर्टिगा मोटार (एमएच 01 बीजे 7865) मधून पाचगणी- महाबळेश्वर येथे पर्यटनाला आले होते. रविवारी (ता. 12) सायंकाळी हे दांपत्य वाईच्या दिशेने जात असताना कुमेल खतायूने थाप्याच्या प्रवेशद्वारातून मोटार आत घातली; परंतु अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती पाचगणीच्या बाजूने वेगाने 300 ते 400 फूट दरीत वेगाने कोसळली. काही अंतरावर कुमेल व सना मोटारीतून बाहेर फेकले गेले. या घटनेची माहिती पाचगणी पोलिसांना मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ एसओएस ग्रुप पाचगणी व महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण केले.

नक्की वाचा - खासदार सुप्रिया सुळेंची उदयनराजेंवर खाेचक टीका

दोराच्या साह्याने पोलिस व ट्रेकर्स अंधारात दरीत उतरून शोध घेताना जखमी अवस्थेतील कुमेल खतायू सापडला. त्यानंतर काही वेळाने त्याची पत्नी सना खतायू मृतावस्थेत आढळल्या. त्यांचा मृतदेह आज दरीतून काढण्यात आला. आज (साेमवार) सकाळी विच्छेदन करून सना यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा - ...म्हणून हाेतेय सातारकरांच्यात पून्हा श्रीनिवास पाटलांची चर्चा

अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मारुती इथापे, अरविंद माने, हवालदार अविनाश बाबर, पोलिस नाईक विजय मुळे, सूरज गवळे, पोलिस कॉन्स्टेबल कीर्तिकुमार कदम, सागर नेवसे, सुनील उंबरकर, निहाल बागवान, मेहुल पुरोहित, अजय बोरा, अनिस सय्यद, विशाल गायकवाड, राजू भंडारी, नरेश लोहारा, तसेच महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे जवान सहभागी झाले होते. 

हेही वाचा -  Video : युवा पिढीने विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श घ्यावा : प्राचार्य पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Dead In Car Accident Near Panchgani