सातारा पालिकेत रंगले मानापमान नाट्य! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सातारा - कोणी कोणाला सांगून जायचे, यावरून सातारा नगरपालिकेत मानापमान नाट्य रंगले. हे नाट्य रंगले थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा व प्रशासन प्रमुख मुख्याधिकारी यांच्यात. मूर्ती विसर्जन स्थळावरून पालिकेपुढे पेच उभा असताना त्यावरील चर्चा कोणी कोणाला सांगून जायचे, इथपर्यंत घसरली. अखेर उपस्थितांनी हस्तक्षेप करत गाडी पुन्हा रुळावर आणली. 

सातारा - कोणी कोणाला सांगून जायचे, यावरून सातारा नगरपालिकेत मानापमान नाट्य रंगले. हे नाट्य रंगले थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा व प्रशासन प्रमुख मुख्याधिकारी यांच्यात. मूर्ती विसर्जन स्थळावरून पालिकेपुढे पेच उभा असताना त्यावरील चर्चा कोणी कोणाला सांगून जायचे, इथपर्यंत घसरली. अखेर उपस्थितांनी हस्तक्षेप करत गाडी पुन्हा रुळावर आणली. 

पोलिस प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी रिसालदार तळे देण्यास नकार दर्शविला. त्यामुळे पालिकेपुढे विसर्जनस्थळाचा पेच उभा राहिला आहे. घरगुती तसेच पाच फुटांच्या मूर्ती विसर्जनासाठी पालिका शहरात चार कृत्रिम तलावांची व्यवस्था करणार आहे. मात्र, त्यापेक्षा मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्‍न आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी काल (ता. 20) रात्री उशिरापर्यंत मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या कक्षात विविध पर्यायांवर चर्चा झाली. नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, नगर अभियंता, कनिष्ठ अभियंते, आरोग्य निरीक्षक व काही सदस्य उपस्थित होते. 

यावेळी "मुख्याधिकारी सांगून जात नाहीत,' असा तक्रारीचा सूर नगराध्यक्षांनी काढला. त्यावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. ""प्रसारमाध्यमांचे फोन येतात. मुख्याधिकाऱ्यांबाबत विचारणा होते, त्यावेळी मी काय उत्तर द्यायचे? आज दुपारीही मुख्याधिकारी पालिकेत नव्हते. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलात की बाहेरगावी? आम्ही नक्की काय समजायचे? मुख्याधिकारी जागेवर नसल्याने आम्हा पदाधिकाऱ्यांना लोकांच्या मोर्चांना सामोरे जावे लागते. मुख्याधिकाऱ्यांनी किमान बाहेर जात असल्याबाबत एसएमएस करावा,'' असे नगराध्यक्षांचे म्हणणे पडले. 

मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात आरोपांचे खंडण केले. ""मला पालिकेच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते. महत्त्वाच्या, तसेच विशिष्ट प्रसंगात बाहेर जाणार असल्याची अवश्‍य कल्पना दिली जाईल. मंत्रालय, आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांना मी उत्तरदायी आहे,'' अशा शब्दात श्री. गोरे यांनी आपले म्हणणे मांडले. 

मूर्ती विसर्जनाच्या स्थळाबाबत मार्ग निघत नसताना भलत्याच विषयावर चर्चा घसरल्यामुळे उपस्थित सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली. कोणाची बाजू घ्यायची, असे संकट अधिकारी-कर्मचाऱ्यांपुढे उभे राहिले. अखेर उपस्थित सदस्यांनी सामोपचाराने घेत मानापमान नाट्यावर पडदा टाकला. 

शहराबाहेर जाणार असल्यास अथवा पालिकेत अनुपस्थित राहणार असल्यास मुख्याधिकाऱ्यांनी आपणाला कळवले पाहिजे. 
-माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा 

प्रत्येकीवेळी बाहेर जाताना सांगून जावे, हे माझ्यावर बंधनकारक नाही. मी राज्य शासनाचा नोकर आहे. शासनाला मी उत्तर देईन. 
- शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा पालिका

Web Title: satara municipal politics