"संकटमोचना' साठी सातारा पालिकेचा अडीच लाख खर्च

सिद्धार्थ लाटकर
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

सातारा पालिकेच्या माध्यमातून मुख्य विजर्सन मिरवणूक मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

सातारा ः "संकटमोचन' म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री गणेशाला निरोप देताना सातारा शहरावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, यासाठी सातारा पालिकेच्या माध्यमातून मुख्य विजर्सन मिरवणूक मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे दोन लाख 40 हजार, तर विसर्जन तळ्यावर मंडप, विद्युत यंत्रणा आदींसाठी सुमारे दोन लाख 77 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेतून प्राप्त झाली. 

गणेशाच्या आगमनाला अवघे दोन दिवस उरले आहेत. घराघरांत, तसेच सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. गणरायाच्या आगमनापूर्वी व विसर्जनापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांचा भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी ठिकठिकाणचे प्रामुख्याने गडकर आळी, बुधवार नाका येथील खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला आहे. याबरोबरच वेगवेगळ्या पेठांमधील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना साथीच्या रोगाची लागण होऊ नये, यासाठी सर्वच प्रभागांमधील रस्त्यांवर जंतुनाशक औषधांची फवारणी तसेच पावडर मारण्याचे काम सुरू आहे. 

गणेशोत्सवातील मुख्य विसर्जन मिरवणूक दिमाखदार असते. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक राजपथावर, तसेच मोती चौक, सदाशिव पेठ याठिकाणी असतात. या मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची यंत्रणा सज्ज असते; परंतु भाविकांच्या सुरक्षिततेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी पोलिस यंत्रणा पालिकेच्या सहकार्याने मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही यंत्रणा बसविते. यंदा देखील पालिकेच्या वतीने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे सुमारे दोन लाख 40 रुपये खर्च करणार आहे. त्याबरोबरच विसर्जन तळ्यानजीक मंडप उभारणे, विविध ठिकाणी विद्युत यंत्रणा उभारणे, जनरेटरची सुविधा आदींसाठी सुमारे दोन लाख 77 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. 

 

पोलिस आणि पालिकेत हवा समन्वय 

"सकाळ' व तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. त्या माध्यमातून मोती चौक, सदाशिव पेठ, शेटे चौक, प्रतापगंज पेठ अशा मुख्य विसर्जन मिरवणुकीतील काही भाग "कव्हर' झालेला आहे. बहुतांश यंत्रणा भाजी मंडई पोलिस ठाण्याच्या संगणकास जोडल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस विभाग आणि पालिकेने समन्वय ठेवून यंत्रणेची सविस्तर माहिती घेतल्यास खर्चाची बचत होईल, अशी शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara municipality will spend two and a half lakhs for CCTV in ganesh festival