विरोधक नरमेनात अन्‌ सत्ताधारी काही तोरा सोडेनात! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सातारा - शहराचे नाक समजलेल्या जाणारा, मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्‍यावरील बाजारपेठ रस्ते वळविल्यामुळे आर्थिक अडचणीत आहे. याशिवाय वाहतुकीची कोंडी, पिण्याचे पाणी, रस्त्यांवरील अतिक्रमणे, तुंबलेली गटारे, वाहणाऱ्या कचराकुंड्या... एक ना अनेक प्रश्‍न असताना आमचे नगरसेवक भांडतात कशावरून तर माझे विषय का आडवलेस! सत्ताधारी असो नाहीतर विरोधक, शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मातृसंस्थेचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आज दोन्हींकडून पार पाडली जाते का? असा प्रश्‍न कालचा गोंधळ पाहिल्यानंतर  पडतो.

पालिकेची कालची (सोमवारी) सभा उडालेल्या गोंधळात ‘पार पडली’ असेच म्हणावे लागेल. (कै.) प्रतापसिंहराजे, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे यांनी पालिकेचे छत्रपती शिवाजी सभागृह चालवले होते. बन्याबापू गोडबोले, आदमभाई बागवान, साहेबराव पाटील, सुधीर धुमाळ, श्रीकांत शेटे, रामभाऊ घोरपडे, प्रकाश गवळी, बाळासाहेब बाबर, संजय जोशी हे व अशा नामवंत व मुरब्बी लोकप्रतिनिधींनी एकेकाळी पालिकेचे सभागृह अभ्यासू वृत्ती, धडाडीच्या वक्तृत्वशैलीने, लोकहिताला प्राधान्य देत गाजवले. खासदार उदयनराजे भोसले यांनी कधी काळी याच सभागृहात बसून राजकारण व समाजकारणाचे धडे गिरवले आहेत. आज त्याच ठिकाणी परस्परांबद्दल हलके शब्दप्रयोग वापरले जात आहेत. यात विरोधक कोठे नमते घेईनात आणि सत्ताधारी आघाडी सोडेनात, असेच चित्र सभागृहात गेल्या दीड वर्षात पाहायला मिळत आहे. 

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका व परिसरातील ५० टक्के व्यवसाय झोपले आहेत. छोटे व्यावसायिक व विक्रेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा आहे. पूर्व आणि पश्‍चिम साताऱ्याला जोडणारा दुवा म्हणजे ‘पोवई नाका जंक्‍शन’ आहे. पर्यायी रस्त्यांवर अतिक्रमणे ‘जैसे थे’ आहेत. 

रस्त्यांची अवस्था बिकट आहे, वाहतूक कोंडी अधून-मधून तोंड वर काढत असते. कधी ग्रेड सेपरेटरचे काम संपतेय असे झाले आहे. तीन महिने झाले हीच स्थिती  असताना यावर शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सभेत कोणी अवाक्षरही काढले नाही. माझा विषय का घेतला नाही, म्हणून विरोधकांनी रुसायचे आणि कोणते काम किती लोकहिताचे आहे, यापेक्षा कोणी सुचविलेले  आहे, या निकषावर ते हाणून पाडायचे. त्याकरिता अजेंडा बदलण्यातच सत्ताधाऱ्यांचा  वेळ आणि ताकद खर्ची पडत आहे. 

कोणाचे आणि कशासाठी लाड?
‘कोणाही नगरसेवकाचे लाड करू नका, लोकहिताला प्राधान्य द्या,’ असा इशारा खासदारांनी प्रशासनाला यापूर्वी अनेकदा दिला आहे. विरोधी सदस्यांचा लाड करण्याचा प्रश्‍नच येत नाही. मग, नेमके कोणाचे आणि कशासाठी लाड केले जातात, याचे आत्मपरीक्षण सत्ताधारी आघाडीला करावेच लागेल. जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या सातारा पालिकेतील कामकाजाकडे जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या पालिका आदर्श म्हणून पाहतात. त्यापद्धतीने आपलेही कामकाज चालविण्याचा त्याठिकाणी प्रयत्न होतो. त्यांनी सातारा पालिकेतील लोकप्रतिनिधींचा कोणता आणि काय म्हणून आदर्श घ्यावा, याचे उत्तर सध्यातरी कोणाकडे नाही.

Web Title: satara nagarparishad corporator subject