‘कर्जमुक्‍ती’कडे दीड लाख शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

उमेश बांबरे
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

३० हजार शेतकऱ्यांनी भरले अर्ज; पण सबमिट करायचे राहून गेले
सातारा - कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यापैकी ३० हजार शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक चुका वा अज्ञानामुळे सादर झालेले नाहीत. अद्याप जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणीकडे दुर्लक्ष केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत वाढविलेल्या मुदतीत शेतकऱ्यांना नोंदणी करून कर्जमुक्तीच्या योजनेत सहभागी होता येणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी विविध ५६ निकषांवर आधारित कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत दिली. पण, दिलेली मुदत संपली तरी शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी अर्ज करण्याकडे दुर्लक्ष केल्याने १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवली.

आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. उर्वरित दीड लाख शेतकऱ्यांनी या नोंदणीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. तसेच नोंदणी केलेल्या तीन लाख शेतकऱ्यांपैकी साधारण तीस हजार शेतकऱ्यांनी भरलेले ऑनलाइन अर्ज सबमिटच करण्यास विसरले आहेत.

यावर पर्याय म्हणून आपले सरकार पोर्टलवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत दाखल अर्ज शेतकरी पाहू शकणार आहेत. तसेच अर्जात झालेल्या चुकांची दुरुस्तीही करता येणार आहे.

त्यामुळे ज्यांचे अर्ज सबमिट करायचे राहून गेलेत, त्यांनी तातडीने या पोर्टलवर जाऊन अर्ज सबमिट करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एकच अर्ज शिल्लक राहून त्याचाच निकषाप्रमाणे माफीत समावेश होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात १०८४ केंद्रे सुरू आहेत.

सचिवांची जबाबदारी 
शेतकरी व गावातील सोसायटीच्या सचिवांनी ऑनलाइन नोंदणी केलेल्या आपापल्या गावातील शेतकऱ्यांची नावे पाहायची आहेत. तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची सूचना करायची आहे. जेणेकरून शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहून नये, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.   

अर्जातील चुकांची दुरुस्ती...
कर्जमाफी मिळण्यासाठी ऑनलाइन दाखल केलेल्या अर्जात दुरुस्तीही करता येणार आहे. त्यासाठी या पोर्टलवर जाऊन लॉगइन करून एडीट ऑप्शनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करता येईल. सध्या आपले सरकार पोर्टलवरील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या ऑप्शनमध्ये जाऊन शेतकरी आपला दाखल केलेला अर्ज पाहू शकतो. 

Web Title: satara news 1.5 farmer ignore to loanfree