साताऱ्यात होणार १७ हजार झाडांचे रोपण

साताऱ्यात होणार १७ हजार झाडांचे रोपण

‘अमृत’ योजनेतून ‘हरित सातारा’ साकारणार; ‘बीव्हीजी’ कंपनीकडे रोपण व संगोपनाचे काम

सातारा - साताऱ्यातील प्रमुख १९ रस्ते, दुभाजक, उद्यानांसाठी आरक्षित जागांवर वृक्षारोपण करण्यासाठी पालिकेला ‘अमृत’ योजनेतून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून साताऱ्यात तब्बल १७ हजार झाडे लावण्याचे पालिकेचे नियोजन आहे. ‘बीव्हीजी’सारख्या अनुभवी कंपनीला हे काम मिळाल्याने नजीकच्या काळात सातारा हरित होण्यास मदत होऊ शकते. 

केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून सातारा पालिकेस वृक्षारोपणासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. त्यातील केंद्र व राज्य सरकारचा पहिल्या टप्प्यातील निधीही पालिकेकडे आला आहे. शहरातील प्रमुख १९ रस्ते व दुभाजकांत वृक्षारोपणासाठी टेंडर काढण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून एक कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात केंद्र सरकार ५०, राज्य सरकार २५ व नगरपालिका २५ टक्के या प्रमाणे हा निधी उभा करण्याचे नियोजन आहे. यानुसार पालिकेला या प्रकल्पासाठी ३६ लाख रुपये निधी उभा करावा लागेल. 

वृक्षारोपण व संगोपनाचे हे काम ‘बीव्हीजी’ या कंपनीला मिळाले आहे. गणपतराव तपासे मार्ग, राजपथ, कर्मवीर पथ, मोळाचा ओढा ते गोडोली, नगरपालिका ते समर्थ मंदिरसह १९ प्रमुख रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बीव्हीजी’कडून शहरात आठ हजार ९५५ झाडे लावण्यात येणार आहेत. ८० टक्के झाडे जिवंत राहावीत, यासाठी कंपनीने दोन मीटरपेक्षा अधिक उंचीची झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. कंपनीकडून वर्षभर या झाडांची निगाही राखण्यात येणार आहे. 
साताऱ्यात हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला मान्यता मिळाली असून त्यासाठीही एक कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या कामात सदरबझारमधील ४०९/२अ, ४०९/३ अ आणि ४०९/८ (सुमित्राराजे उद्यान) व ४८२ मंगळवार पेठ येथील सुमारे दोन हेक्‍टर जागेत सात हजार ७१५ झाडे लावण्यात येणार आहेत. वृक्षारोपणासाठी एक कोटी दोन लाख ८२ हजार आणि लॉन तयार करण्यासाठी १५ लाख १४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. सिंचन व्यवस्था व किरकोळ बांधकामासाठी २८ लाख ६० हजार ११२ रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

पावसाळ्यातच वृक्षारोपणाची गरज
पावसाळा सुरू झाल्याने पालिकेने तातडीने वृक्षारोपणाचे काम हाती घेण्याबाबत ठेकेदाराला सांगणे अपेक्षित आहे. नुकतेच रुंदीकरण झालेल्या व काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांवर, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडांचे रोपण करावे, जेणेकरून रात्रीच्यावेळी या रस्त्यांवर समोरून येणाऱ्या वाहनांवर विजेचे प्रखर झोत पडणार नाही, अशी सूचना नागरिकांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com