सम्राट मंडळाकडून आठ कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

‘सकाळ’ने पुढाकार घेतल्याबद्दल पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडून प्रशंसा

सातारा - ‘एक मंडळ-एक सीसीटीव्ही’ या ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनास शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. सप्ततारा गणेश मंडळापाठोपाठ शनिवारी (ता. दोन) सदाशिव पेठेतील श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने आठ कॅमेऱ्यांसह अन्य यंत्रणा पोलिस दलास भेट दिली. आत्तापर्यंत ६८ सीसीटीव्ही जमा झाल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ‘सकाळ’ने घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली. 

‘सकाळ’ने पुढाकार घेतल्याबद्दल पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडून प्रशंसा

सातारा - ‘एक मंडळ-एक सीसीटीव्ही’ या ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनास शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. सप्ततारा गणेश मंडळापाठोपाठ शनिवारी (ता. दोन) सदाशिव पेठेतील श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने आठ कॅमेऱ्यांसह अन्य यंत्रणा पोलिस दलास भेट दिली. आत्तापर्यंत ६८ सीसीटीव्ही जमा झाल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ‘सकाळ’ने घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली. 

गणेशोत्सवापूर्वी ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’बाबत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात बैठक झाली होती. त्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी गणेशोत्सव मंडळांनी खर्चात बचत करून त्यांच्या परिसरात, भागात, शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘सकाळ’ने मंडळांना केले होते. त्यास मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता प्रत्यक्ष सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा तसेच पोलिस दलाकडे सुपूर्त करण्यास प्रारंभ झाला आहे. 

सदाशिव पेठेतील श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने आठ कॅमेरे बसविले आहेत. त्यामध्ये चार कॅमेरे सम्राट चौकात, दोन कॅमेरे जुना मोटार स्टॅंड परिसरात, दोन कॅमेरे भवानी ज्वेलर्स येथे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही यंत्रणा सम्राट मंडळाने पोलिस दलाकडे नुकतीच सुपूर्त केली. त्याचे उद्‌घाटन शनिवारी रात्री पोलिस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी पाटील यांनी ‘सकाळ’ने तसेच सम्राट मंडळाने घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘आम्ही ‘सकाळ’च्या माध्यमातून  ‘एक मंडळ-एक सीसीटीव्ही’ हा उपक्रम हाती घेतला. सम्राट मंडळाने त्यास प्रतिसाद दिला. यामुळे महिलांची सुरक्षितता होईल. यापुढेही मंडळांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.’’ कार्यक्रमास श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब तांबोळी, उपाध्यक्ष पद्माकर खुटाळे, शंभू तांबोळी, अमोल टंकसाळे, उमेश खत्री, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे धुमाळ, बेंद्रे, विजय पवार आदी उपस्थित होते.

सीसीटीव्हीने केला ‘श्रीगणेशा’
सम्राट मंडळाने बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत सदाशिव पेठेत नुकत्याच झालेल्या अपघाताचे चित्रण कॅमेराबद्ध झाले होते. यंत्रणेचे उद्‌घाटन झाल्यानंतर घटनेच्या हालचाली पोलिस अधीक्षक पाटील यांनी पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करा, असा आदेश दिला. त्यावर कार्यकर्ते अवाक्‌ झाले तर पाटील यांनी ‘श्रीगणेशा’ झाला म्हणायचा तर, असे उद्‌गार काढले.

मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षास प्रारंभ झाला आहे. वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून तसेच सामाजिक सुरक्षिततेसाठी मंडळाने सातारा पोलिस दलास सीसीटीव्ही यंत्रणेसाठी आवश्‍यक असणारे आठ कॅमेरे, डीव्हीआर, हार्डडिस्क, मॉनिटर असे साहित्य भेट दिले आहे. जुना मोटार पोलिस चौकीतून त्याचे नियंत्रण होणार असल्याने संपूर्ण बाजारपेठ सुरक्षित करण्यासाठी मंडळाने मोलाचा वाटा उचलल्याचे समाधान वाटते.
- बाळासाहेब तांबोळी, अध्यक्ष, श्रीमंत महागणपती सम्राट मंडळ, सातारा.

Web Title: satara news 8 camera by samrat mandal