आनेवाडी, खेड शिवापुरात ‘फास्टॅग’कडे दुर्लक्ष

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 30 मार्च 2018

दुप्पट शुल्क आकारणीचा नियम! 
प्रत्यक्षात टोल नाक्‍यांवर आलेल्या वाहनांच्या तुलनेत कमी संख्या दाखवणे, काही वाहनांना टोलमधून सवलत देणे आदी कारणांमुळे शासनाचा महसूल बुडत होता. त्यामुळे ‘फास्टॅग’ प्रणाली कार्यान्वित झाली. ‘फास्टॅग’ धारकांसाठी असणाऱ्या राखीव लेनमध्ये अन्य वाहने आल्यास संबंधितांकडून दुप्पट शुल्क आकारणी घेण्याचा नियम आहे; परंतु त्याचे व्यवस्थापनच योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

सातारा - आनेवाडी, तसेच खेड शिवापूर या दोन्ही टोलनाक्‍यांवरील रांगा टाळण्यासाठी नित्यनेमाने पुण्याला जाणाऱ्या वाहनधारकांनी ‘ई- टोल’ला पसंती दिली खरी; परंतु ‘फास्टॅग’ असणाऱ्या वाहनांसाठी राखीव लेन ठेवल्या जात नाहीत, अशा तक्रारी वारंवार वाढू लागल्या आहेत. विशेषतः दुधाच्या गाड्या, एसटी, उद्योजकांसह नोकरदार वर्गांच्या वाहनांना इच्छित प्रवासासाठी विलंब होत आहे. वाहनाधारकांचा वेळ, इंधन वाचावे, वायू प्रदूषण, कागदाचा वापर कमी व्हावा या हेतूने राष्ट्रीय व राज्यातील टोलनाक्‍यांवर ‘फास्टॅग’ ही ई-टोल प्रणाली बसविण्यात आली आहे. 

सातारा जिल्ह्यातील आनेवाडी, तासवडे याबरोबरच पुणे जिल्ह्यातील खेड- शिवापूर येथील टोलनाक्‍यावर ही ‘फास्टॅग’ प्रणाली बसविण्यात आली आहे.

टोल नाक्‍यांवरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल, या अपेक्षेने मोठ्या संख्येने वाहनधारकांनी ‘फास्टॅग’ला पसंती दिली आहे. या सुविधेचे संचालन ‘नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात ‘एनएचएआय’द्वारे करण्यात येते. ई- टोलवसुलीसाठी आवश्‍यक ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ तंत्रज्ञान वाहनाच्या काचेवर लावलेले असतात. वाहन टोलनाक्‍यावर आल्यानंतर संबंधित यंत्रणा वाहनाच्या काचेवरील फ्रिक्वेन्सीचे वाचन करून प्रीपेड अकाउंटमधील पैसे कापून घेते. त्याबाबतचा संदेश ही नोंदणीकृत मोबाईलवर येतो. गेल्या काही महिन्यांपासून आनेवाडी, तसेच खेड शिवापूर टोलनाक्‍यावर ‘फास्टॅग’साठी राखीव असलेल्या लेनमध्ये रोख पैसे देणारे वाहनधारक ही त्यांची वाहने दामटत आहेत. यामुळे आगाऊ पैसे देऊन ही ‘फास्टॅग’ वाहनधारकांना नाहक रांगेत थांबावे लागते. या प्रकारामुळे काही वेळेला टोल नाक्‍यावरील कर्मचारी आणि वाहनधारकांची वादावादी देखील होत असते. ‘फास्टॅग’च्या गैरव्यवस्थापनाचा सर्वाधिक फटका दुधाच्या गाड्या, एसटी, उद्योजक, नोकरदारांना बसत आहे. ज्या पद्धतीने तासवडे टोलनाका येथे शिस्तबद्धरीत्या फास्टॅग यंत्रणेचे सक्षम व्यवस्थापन करण्यात येत आहे, त्याच पद्धतीने आनेवाडी, तसेच खेड शिवापूर येथे व्हावे, अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करू लागले आहेत.

Web Title: satara news aanewadi khed shivapur fastag