खडतर परिश्रमातून झाले अंतराळवीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

सातारा - तब्बल ४० तास न झोप घेता खडतर प्रशिक्षण घेतले. खूप त्रास सहन केला. तेव्हा कोठे अंतराळवीर होण्याचे लहानपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. परिश्रम, झपाटून काम करण्याची वृत्ती व त्याला सकारात्मक विचारांची जोड दिली, तर यश निश्‍चित मिळते, असे मत ‘नासा’च्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या रॉकेट 
वुमन अमिना पाटील- साबळे यांनी व्यक्त केले.

येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अमिना पाटील- साबळे यांचे नुकतेच व्याख्यान झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. 
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, इतर पदाधिकारी, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य डॉ. एच. व्ही. देशमुख, प्रा. ए. जी. पोतदार, अमिना पाटील- साबळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. श्रीमती पाटील- साबळे या सध्या ‘नासा’त कार्यरत आहेत. ‘नासा’च्या ‘हेरा- सात’च्या कमांडर व पॉस्युम प्रोजेक्‍टवर त्या काम करत आहेत. त्यांनी ‘बालपण ते अंतराळवीर’ या आपल्या जीवन प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

बालपणीच अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने मी 
शालेय जीवनापासूनच प्रवास सुरू केला होता. जळगावमधून एमएस्सी केल्यानंतर अमेरिकेतील ‘एरोस्पेस’मधील एमएस केले. हे सर्व करताना सतत परिश्रम घेत राहिले. २०१२ मध्ये ‘नासा’मध्ये प्रवेश केला. ‘नासा’च्या विविध मोहिमांत सहभागी होऊन यशस्वी केल्या, असे सांगून त्यांनी स्कुबा डायव्हिंग, ट्रेनर, स्काय डायव्हिंग यामधील अनुभव सांगितले. न झोपता सलग ४०- ४० तास प्रशिक्षण घ्यावे लागले, असे सांगत या साऱ्या प्रवासात कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी आणिबाणीच्या परिस्थितीला अंतराळात सामोरे जाण्याचे प्रसंग ‘स्लाईट शो’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे सादर केले. त्यांच्या यशोगाथेला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने मानवंदना दिली.

प्राचार्य डॉ. कानडे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली. प्रा. रोहिणी शिंदे, प्रा. दीपश्री मुतालिक यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: satara news amina patil sabale astronauts success story