सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

सातारा - सही करून घरी जाणे, एकाच्या नावावर दुसऱ्याने खोटी सही करून हजेरी लावणे, हजेरी मांडणाऱ्या कर्मचाऱ्यास ‘मॅनेज’ करून काम न करता पगार घेण्याचे प्रकार सर्रास घडतात. त्याला छेद देत ‘काम नाही तर दाम नाही’ असा संदेश देत पालिकेचे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी नव्या वर्षात सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायामेट्रिक मशिन आणण्याचा संकल्प केला आहे.

सातारा पालिका अशी १२ बायोमेट्रिक मशिनस खरेदी करणार आहे. तसा प्रस्ताव उद्याच्या (बुधवार) आरोग्य समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे. सकाळी, तसेच दुपारी अशा दोन सत्रांमध्ये पालिकेचे सफाई कर्मचारी काम करतात. गेल्या काही वर्षांत शहराच्या बहुतांश भागामध्ये दुसऱ्या सत्रात कर्मचारी रस्त्यावर काम करताना दिसायचेच नाहीत. मुकादमकडील हजेरी पत्रकावर महिनाअखेरीस सर्वांच्या सह्या असायच्या. अस्थापनेवरील कर्मचारी कमी पडू लागल्याने पालिकेने सुमारे ५० कर्मचारी मक्ता पद्धतीने घेतले. या कर्मचाऱ्यांमध्येही कामावर वेळेवर हजर राहण्यामध्ये सुसूत्रता दिसत नव्हती. 

सभापती वसंत लेवे यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या वेळात प्रत्यक्ष हजेरीच्या ठिकाणांवर अचानक जाऊन तपासणी केली. हजेरी पुस्तकावर असलेल्या सह्या व समोर प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी यामध्ये तफावत आढळून आली. तोंडी समज देऊन पगार कापून संबंधितांना जबाबदारीची  जाणीव करुन देण्याचा प्रयत्न पदाधिकारी व प्रशासनाकडून झाला. मात्र, कमी- अधिक प्रमाणात हे प्रकार सुरूच राहिले. त्यामुळे आरोग्य विभागात शिस्तीचा भाग म्हणून सफाई कर्मचाऱ्यांसाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेता येतील, अशी बायोमेट्रिक मशिन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यात पालिकेकडून एकूण १२ मशिन खरेदी करण्यात येणार आहेत.

ठराविकच कर्मचारी कामचुकारपणा करतात. मात्र, इतर प्रामाणिक सफाई कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. त्यामुळे ‘काम नाही तर दाम नाही’ या तत्त्वानुसार बायोमेट्रिक मशिनवर हजेरी नाही, तर कर्मचाऱ्याला पगारही मिळणार नाही. त्यामुळे दांडीबहाद्दरांवर वचक बसेल.
- वसंत लेवे, सभापती, आरोग्य समिती सातारा 

Web Title: satara news Biometric attendance cleaning workers