माणसा... माणसा... ‘अशी पाखरे हवीच...!’ 

शैलेन्द्र पाटील
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सातारा - माणसानं निसर्गाबद्दल थोडी जागरूकता व पुरेशी संवेदनशीलता दाखविल्यास माणसांपासून दुरावत उडून गेलेली पाखरं पुन्हा आसपास येऊ शकतात. साताऱ्यातील काही पर्यावरणप्रेमींनी हे उदाहरणासह दाखवून दिले आहे. या कामगिरीसाठी राजपथावरील मोरगाव ग्रुप व मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत. 

सातारा - माणसानं निसर्गाबद्दल थोडी जागरूकता व पुरेशी संवेदनशीलता दाखविल्यास माणसांपासून दुरावत उडून गेलेली पाखरं पुन्हा आसपास येऊ शकतात. साताऱ्यातील काही पर्यावरणप्रेमींनी हे उदाहरणासह दाखवून दिले आहे. या कामगिरीसाठी राजपथावरील मोरगाव ग्रुप व मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत. 

साताऱ्याच्या ऐतिहासिक राजपथावरील मोती चौक ते तालीम संघ या टापूत रस्त्याकडेला एकही झाड नाही. सिमेंट काँक्रिटच्या गर्दीमध्ये डोळ्यांना थोडा तरी हिरव्या झाडांचा दिलासा मिळावा,  या उद्देशाने भवानी पेठेतील राजपथाच्या दोन्ही बाजूचे रहिवासी-व्यापारी बांधव एकत्र आले. विजेच्या तारा, अंडरग्राउंड गटारे यामुळे याठिकाणी वृक्षारोपण  शक्‍य नाही. त्यांनी मोरगाव ग्रुप व मारवाडी भुवन  गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हिरव्या रंगाचे मोठे कॅन व कुंड्यांत झाडे लावली. सुमारे ४० झाडे राजपथालगतच्या पदपथावर पाहायला मिळतात. प्रवीण राठी, संतोष लुणालत, ॲड. रणजित राठी, चंद्रकांत कासट, योगेश लुणावत, मामा लुणावत आदींनी या झाडांच्या जोपासनेसाठी योगदान दिले.

निसर्ग आणि निसर्गातील सर्व घटक यांच्याबरोबरच्या सहजीवनातच माणसाचा खरा आनंद आहे, याचा प्रत्यय या सातारकरांनी नुकताच घेतला. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात यातील एका झाडावर बुलबुल पक्ष्याने घरटे केले. त्यात त्याच्या अंड्यातून तीन पिल्लांनी जन्म घेतल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. पंखात बळ येईपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव या पिल्लांना ‘सोशल मीडिया’पासून लांब ठेवण्याचा मोह सर्वांनीच आवरला. काही दिवसांपूर्वीच ‘स्काय इज लिमिट’ असा संदेश देत घरट्यातील पिल्ले आकाशात झेपावली..! 

या घटनेसंदर्भात प्रवीण राठी यांनी सांगितले, ‘‘आम्ही सर्व नागरिक गेले दीड वर्ष या झाडांची काळजी घेतो. आणखी दोन वर्षांत या झाडांची पुरेशी वाढ झाल्यानंतर राजपथाचे चित्र आणखी वेगळे दिसेल. दसरा मिरवणुकीवेळी गर्दीचा धक्का लागून पिल्ले खाली पडू नयेत, म्हणून आम्ही झाडाची काळजी घेत होतो. ही पिल्ले उडून गेल्याचे समजल्यानंतर मिळणारा आनंद वेगळाच आहे.’’

निसर्ग आणि माणूस यांच्यातील समतोल किंवा एकमेकांना जोडणारी साखळी मानवी हव्यासामुळे खंडित झाली आहे. ती जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास माणसाचे झालेले नुकसान हे न भरून येणारे नव्हे तर आपल्या सवयी-वर्तनात थोडी दुरुस्ती केल्यास भरून येणारे आहे. साताऱ्यातील निसर्गप्रेमींनी दीड वर्षांपूर्वी केलेला प्रयत्न व त्याचे मिळालेले फळ हे त्याचेच द्योतक मानावे लागेल. निसर्गाची आपल्या हातून झालेली हानी आपणच भरून काढू शकतो, हे सातारकरांनी यानिमित्ताने सिद्ध केले आहे.  

सर्वाधिक झाडांचे शहर व्हावे 
सर्वाधिक झाडे असलेले बंगळूर हे देशातील एकमेव तर नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर गणले जाते. जास्तीत जास्त झाडांचे शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्या शहराचे नाव नागपूरच्या बरोबरीने घेतले जावे, यासाठी सातारकरांना चांगली संधी आहे. त्या दिशेने सातारकरांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. ‘आरंभशूर’ ठरण्यापेक्षा ‘संकल्प तडीस नेणारे सातारकर’ असा आपला लौकिक व्हावा, यासाठी प्रत्येक सातारकर नागरिकावरील जबाबदारी वाढली आहे!

Web Title: satara news bird