भाजप महामेळाव्याची जिल्ह्यामध्ये लगीनघाई!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबईत भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या महामेळाव्यास जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे विभागवार जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
- ॲड. भरत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप

सातारा - भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महामेळाव्यास सातारा जिल्ह्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते जाणार असून त्याचे नियोजन सध्या जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी करत आहेत. 

कऱ्हाड येथे नुकतीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या महामेळाव्यास जिल्हास्तरावरून जाण्याचे नियोजन करण्यात आले. येत्या सहा एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन असून, या वर्धापनदिनी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये शक्तिप्रदर्शन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदारांपासून ते सरपंचांपर्यंतचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सातारा जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित राहतील, याचे नियोजन केले जाणार आहे. राज्यातील ८४ हजार बुथमधून बुथप्रमुख, शक्तीकेंद्रे प्रमुख, सरपंचापासून ते आमदारांपर्यंत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या महामेळाव्यास येणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावरील नियोजन करून विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे. आता तालुकानिहाय बैठकाही सुरू होणार आहेत. त्यात तालुक्‍यातून किती कार्यकर्ते महामेळाव्यास जाणार, त्यांचे जाण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामध्ये माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. भरत पाटील, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, दीपक पवार, अनिल देसाई, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महेश शिंदे, अनुप सूर्यवंशी, रामकृष्ण वेताळ यांसह प्रमुखांकडे विभागवार जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आता हे सर्व प्रमुख विभागवार बैठका घेऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे नियोजन करणार आहेत.

Web Title: satara news bjp mahamelava