मुळात अशी वेळ का येते? 

संजय शिंदे
बुधवार, 28 जून 2017

माण तालुक्‍यातील विरळी येथील पाच वर्षांच्या मंगेश जाधव या मुलाचा उघड्या बोअरवेलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर त्याचे गांभीर्य समोर आले. या घटनेनंतर ग्रामस्थ आणि प्रशासनाची तत्परता कौतुकाची असली, तरी आधीच उपाययोजना केल्या असत्या तर दुर्घटना टाळता आली असते...

सरकारचा निर्णय २०० फूट बोअरवेलचा असतानाही जिल्ह्यात विशेषत ः माण, खटाव तालुक्‍यांमध्ये शेतीसाठी सरासरी ४०० ते एक हजार फूट खोलीच्या बोअरवेल घेतल्या जातात. यातील फक्त ३० ते ३५ टक्के बोअरवेललाच पाणी असते. निम्म्यापेक्षा जास्त कोरड्याच असतात. पाण्याच्या बोअरवेलही हंगामी चालतात. प्रत्येक विंधनविहिरीची व ती खोदणाऱ्यांची सरकारदप्तरी नोंद बंधनकारक असेल, अशी भूजल विकास व व्यवस्थापन कायद्यात तरतूद आहे. तिचा भंग करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे. आता प्रश्‍न आहे हा कायदा कठोरपणे राबविण्याबाबत. सध्या जिल्ह्यात कोणत्या गावात किती बोअरवेल आहेत, याची कोणत्याच यंत्रणेकडे नोंद नाही. उघड्या बोअरवेलमध्ये मुले पडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रशासन व न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही. बोअरवेल खोदल्यानंतर तिला पाणी लागले नाही, तर आतमध्ये टाकण्यात आलेला केसिंग पाइप न काढणे आणि काढलाच तर ती बोअरवेल माती टाकून व्यवस्थित बुजविणे ही काळजी संबंधित शेतकरी घेत नसल्यानेच हे अपघात घडत आहेत. 

सततच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी लागेल, या आशेने माण, खटाव तालुक्‍यामधील शेतकरी दोन- तीन बोअरवेल घेतात. पाणी नाही लागल्यावर ती बुजविली जात नाही. खडकापर्यंत खोदलेल्या बोअरवेलमध्ये माती व मुरुम पसरू नये, यासाठी त्यात पाइपचे केसिंग करतात. पाणी लागले नाही तर केसिंगवर कॅप बसवून बोअरवेल बंद करतात. अनेकदा शेतकरी केसिंग काढून टाकतात. मात्र, उर्वरित खड्डा पक्का बुजविण्याची जबाबदारी टाळतात. केसिंग काढल्यावर खड्डा वाढतो. त्यात लहान मूल सहज पडू शकते. त्यामुळे कोरड्या विंधनविहिर बुजवण्याची कायदेशीर जबाबदारी संबंधितावर ठेवावी. त्यासाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी.

शेणोलीकरांच्या आठवणी झाल्या ताज्या...
शेणोली (ता. कऱ्हाड) येथील एक बालक नऊ जून २००९ रोजी बोअरच्या खड्डयात पडले होते. शर्तीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवण्यात यश आले नाही. मात्र, काल विरळी (ता. माण) नजीकच्या कापूसवाडी येथील बोअरमध्ये असेच बालक पडल्याने शेणोलीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या. शेणोली येथील रोहित संजय शिकारे हा पाच वर्षांचा मुलगा खेळताना आठ वर्षांपूर्वी बोअरच्या खड्डयात पडला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेसह ग्रामस्थांनी त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करूनही तब्बल १४ तासानंतर त्याला वर काढण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. काल कापूसवाडीतही सहा वर्षांचा मंगेश जाधव हा बोअरच्या खड्डयात पडल्याने शेणोलीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या. 

विंधनविहीर बुजवण्याची काळजी घ्या
विंधनविहिरीला पाणी लागले, की धार्मिक विधीद्वारे ग्रामस्थांना त्याची कल्पना दिली जाते. त्याचप्रकारे विंधनविहीर कोरडी गेल्यानंतर ती व्यवस्थित बुजविली की नाही, याची माहिती ग्रामस्थांना असतेच. त्या वेळीच संबंधिताला सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांनी सूचना केल्यास अपघात टळतील.

Web Title: satara news borewell