बेघरांना निवारा, सीसीटीव्ही व वायफाय यंत्रणाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सातारा - बेघरांना निवारा, कास धरण उंची वाढ, हरितपट्टा विकास, पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, रस्ते व उद्यानांचा विकास, सुधारित वाहतूक आराखडा तयार करणे, सीसीटीव्ही आणि वायफाय यंत्रणा, जलतरण तलाव दुरुस्ती आदी कामांच्या तरतुदींसह २२८ कोटी ६० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास आज सभेने बहुमताने मंजूर केला. या सभेला ४४ पैकी १२ सदस्य अनुपस्थित होते. 

सातारा - बेघरांना निवारा, कास धरण उंची वाढ, हरितपट्टा विकास, पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, रस्ते व उद्यानांचा विकास, सुधारित वाहतूक आराखडा तयार करणे, सीसीटीव्ही आणि वायफाय यंत्रणा, जलतरण तलाव दुरुस्ती आदी कामांच्या तरतुदींसह २२८ कोटी ६० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास आज सभेने बहुमताने मंजूर केला. या सभेला ४४ पैकी १२ सदस्य अनुपस्थित होते. 

नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सातारा पालिकेचा पाच लाख ९५ हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याला विरोधी पक्षनेते अशोक मोने, सिद्धी पवार, शेखर मोरे आदींनी विरोध दर्शविला. ॲड. दत्ता बनकर, राजू भोसले, निशांत पाटील यांनी सातारा विकास आघाडीची बाजू मांडत अर्थसंकल्पीय तरतुदींचे समर्थन केले. माजी सभापती वसंत लेवे यांनी अर्थसंकल्पातील  त्रुटींवर बोट ठेवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

खर्चाच्या ठळक बाबी
भुयारी गटार योजना व हरित पट्टे विकास- ४० कोटी ७० लाख, गटारे- सव्वाकोटी, रस्ते बांधणी- पाच कोटी ५० लाख, शाहू कलामंदिर सुधारणा- एक कोटी, भूसंपादन- दोन कोटी, उद्याने विकास- ५० लाख, एलईडी दिवे- दोन कोटी, अंध-अपंग कल्याण योजना- २२ लाख, क्रीडा कार्यक्रम- २० लाख रुपयांची 
तरतूद केली आहे. 

...असे मिळणार उत्पन्न
पालिकेने पाणी करातून तीन कोटी ५० लाख, मालमत्ता कर- १२ कोटी, जाहिरात कर- एक कोटी ३५ लाख, इमारत भाडे व जागा भाडे- सव्वा कोटी, रस्ते विकास- चार कोटी, अमृत योजना- ३६ कोटी ५५ लाख, कास धरण उंची वाढ- १६ कोटी, पंतप्रधान आवास योजना- दहा कोटींची जमा बेरीज केली आहे. 

चर्चेत सदस्यांची उदासीनता
विरोधी नगर विकास आघाडीच्या दीपलक्ष्मी नाईक यांच्याबरोबरच लीना गोरे, मनीषा काळोखे या महिला सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. सत्ताधारी आघाडीतील नेहमीचे चार-पाच शिलेदारच चर्चेत होते. ४४ सदस्यांच्या सभागृहात आज पाच जणांनी रजेचा अर्ज दिला होता, तर सात जणांनी चक्क दांडी मारली. भाजपचे स्वीकृत सदस्य ॲड. प्रशांत खामकर यांनी चारच दिवसांपूर्व राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त होती. 

रुपया असा येणार...
 पालिका दर व कर : ९पैसे
 महसुली अनुदाने : १८ पैसे
 विशेष अनुदाने : ५५ पैसे
 फीपासून उत्पन्न : ५ पैसे
 व्याज व विलंब आकार : ३ पैसे
 कर्जे : १ पैसा
 इतर उत्पन्न (संकीर्ण) : १ पैसा
 ठेवी : ८ पैसे

रुपया असा जाणार...
 आस्थापना व प्रशासन खर्च : १४ पैसे
 सार्वजनिक सुरक्षितता व सोयी : ३ पैसे
 आरोग्य व सोयी : २ पैसे
 शिक्षण : १ पैसा
 दुरुस्ती देखभाल : २ पैसे
 विकासकामे : ७१ पैसे
 असाधारण खर्च : ६ पैसे
 पाणीपुरवठा : १ पैसा

Web Title: satara news CCTV wi-fi