थांबा... मुलांना गाडी देऊ नका!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

अनेकदा कारवाया करूनही अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या येत आहेत. पालक आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यामुळे त्यांना दंड करण्याची कारवाई सुरू केली आहे.
- सुरेश घाडगे, सहायक निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

सातारा - अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना सापडल्यास आता त्याच्या वडिलांना एक हजार रुपये दंड करण्याची कारवाई वाहतूक शाखेने सुरू केली आहे. त्यामुळे लहान मुलांना गाडी चालवायला देणे आता पालकांसाठी त्रासदायक होणार आहे. 

मोटार वाहन कायद्यानुसार १६ वर्षांवरील मुलांना गिअर नसलेली आणि १८ वर्षांवरील मुलांना गिअर असलेली दुचाकी चालविण्याची परवानगी आहे.

त्यानुसार या मुलांना वाहन चालविण्याचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागातून दिला जातो. असा परवाना मिळाल्यानंतरच मुलांनी गाडी चालविणे अपेक्षित आहे. मात्र, मुलाची हौस भागविण्यासाठी अनेक जण मोटर वाहन कायद्यातील वयाच्या नियमापूर्वी मुलांना गाडी चालवायला शिकवतात. गाडी एकट्याला गर्दीच्या रस्त्यांवर चालवायलाही देत आहेत.

पाल्याच्या या हट्टापायी रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांच्या जीवला धोका होऊ शकतो. याचा मात्र, पालकांना विसर पडताना दिसत आहे. त्यामुळे साताऱ्यातील रस्त्यांवर अनेक अल्पवयीन महाविद्यालयीन मुले सर्रास गाड्या चालवताना दिसतात. त्यामध्ये भरधाव वेगाने गाडी चालविण्याचे प्रमाणही अधिक आहे.

अशा वाहन चालविणाऱ्या मुलांवर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक शाखा गेल्या काही महिन्यांपासून धडक मोहीम राबवत आहे. मात्र, किरकोळ दंड केल्यानंतरही मुलांचे वाहन चालविणे बंद होताना दिसत नाही. त्यामुळे अपघाताचे अनेक प्रसंग घडले आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेने आता पालकांनाही दंडाच्या कचाट्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमानुसार वय पूर्ण नसलेला मुलगा गाडी चालवताना आढळल्यास वाहतूक शाखेकडून पालकांवर खटला दाखल केला जात आहे. खटल्यामध्ये होणाऱ्या दंडाच्या पोटी वाहन चालकाच्या पालकाकडून एक हजार रुपयांचा दंडही वसूल केला जात आहे. दंड भरण्यास तयार नसणाऱ्यांवर न्यायालयामध्ये खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

शहराबरोबरच जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहतूक शाखेने अशा प्रकारच्या कारवाया सुरू केल्या आहेत. त्यामुळे पालकांनी सावधानता बाळगत वय पूर्ण नसलेल्या मुलांच्या हातात गाडी देणे टाळले पाहिजे.

Web Title: satara news child vehicle