दुरुस्तीच्या नावाखाली नव्या बांधकामांत वाढ 

दुरुस्तीच्या नावाखाली नव्या बांधकामांत वाढ 

सातारा - जुन्या बांधकामांत टी अँगल उभे करून, आहे त्या जागेवर नवे बांधकाम केले जाते. या माध्यमातून प्रशासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे प्रकार शहरांत सर्रास सुरू आहेत. साताऱ्यात अशा पद्धतीच्या दोन मोठ्या आणि हमरस्त्यावरील बांधकामांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. केवळ नोटिसांवर न थांबता फसवणूक करू पाहणाऱ्या अशा बांधकामांवर हातोडा फिरविण्याचे धाडस सातारा पालिका प्रशासन दाखवणार का, हा खरा प्रश्‍न आहे. 

कोणत्याही इमारतीचे बांधकाम करताना पालिकेच्या नियमानुसार "सेटबॅक' सोडावा लागतो. शहराच्या विकास आराखड्यामध्ये नियोजित रस्ता रुंदीकरणासाठी नव्या इमारतीचे बांधकाम रस्त्यापासून मागे सरकून करावे लागते. या बांधकामासाठी पालिकेकडून परवानगी घेताना सेट बॅक, पार्किंग, जिना, गॅलरी, साईड मार्जिन, रोड मार्जीन, खिडक्‍या, एफएसआय आदींबाबत नियमांचे पालन करावे लागते. हे सर्व नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या मर्जीप्रमाणे बांधकाम करून उखळ पांढरे करून घेण्यासाठी लोक पर्याय शोधू लागतात. मग, अशांना कोणीतरी गुरू भेटतो आणि मग शनिवार- रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी, काही वेळा रात्रीही बांधकामे केली जातात. असे बांधकाम टी अँगलमध्ये केले जाते.

नगररचना अधिनियमानुसार घरदुरुस्तीसाठीही पालिकेची परवानगी आवश्‍यक असते. अशी कोणतीही परवानगी न घेता जुन्या बांधकामांत ठराविक अंतरावर भिंत फोडून लोखंडी खांब (गर्डर) उभे केले जातात. या टी अँगलवर मजले चढविले जातात. या सर्व गोष्टी हळूहळू केल्या जातात. सरकारी सुटीच्या दिवशी शक्‍यतो बांधकाम केले जाते. आतील भिंती उतरवून नव्या भिंती बांधल्या जातात. नंतर सर्वात शेवट दर्शनी भागातील जुनी भिंत उतरवून नवी बांधली जाते. आता ज्या इमारतीचा केवळ जोता जुना आहे. बाकी त्यात जुने काहीही राहिलेले नाही, अशास "इमारत दुरस्ती' असे म्हणून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे प्रयत्न होतात. अपवाद वगळता बहुतेक वेळा यामध्ये प्रशासन आणि बांधकामदार यांची मिलीभगत असते. स्थानिक लोकप्रतिनिधीचाही अशा कामांवर "प्रभाव' असू शकतो. 

राजवाड्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर, जुन्या चित्रा टॉकीजलगत (यादोगोपाळ पेठ) एका इमारतीचे बांधकाम याच पद्धतीने गेले काही महिने सुरू होते. चांदणी चौकातून समर्थमंदिरकडे जाणारा रस्ता अपुरा आहे. तातडीने रुंदीकरण करण्याची गरज आहे. अशा स्थितीत एकच इमारत रुंदीकरणास अडथळा ठरत आहे. संबंधिताने रस्ता रुंदीकरणासाठी नियमानुसार रोड मार्जिन व सेट बॅकमधील जागा वाचविण्यासाठी पूर्वीचा ढाचा कायम ठेवून टी अँगलमध्ये बांधकाम सुरू केले. असाच प्रकार रामाचा गोट येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाबाबत झाला. गेल्या वर्षीभरापासून कोणतीही परवानी न घेता टुकूटुकू बांधकाम सुरू होते. पालिका प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी गेल्यानंतर संबंधितांना पालिकेने बेकायदा बांधकाम पाडून टाकण्याची नोटीस बजावली आहे. 

52-53 म्हणजे काय रे भाऊ आहे!  
प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 व 53 नुसार पालिका संबंधित बांधकामदाराला झालेले बेकायदेशीर बांधकाम स्वत:हून पाडून टाकण्याचा आदेश देते. दिलेल्या नोटिसीनंतर 30 दिवसांत संबंधिताने हा आदेश न मानल्यास पालिका बांधकामदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करू शकते, तसेच स्वत:ची यंत्रणा लावून बेकायदा बांधकाम पाडते. याकरिता आलेला खर्च संबंधिताकडून वसूल करण्याची तरतूद पालिका अधिनियमात आहे. या सर्वाची कार्यवाही करण्याच्या नोटिशीला रूढ भाषेत "52-53'ची नोटीस असे म्हटले जाते! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com