गोडोलीत जीवघेणा ठरतोय यू टर्न..!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

कामाठीपुऱ्याजवळची स्थिती; अर्धवट कामामुळे जाताहेत जीव 

सातारा - पोवई नाक्‍यावरून गोडोलीकडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकाला चुकीच्या ठिकाणी ‘यू टर्न’साठी जागा सोडल्यामुळे जीवघेणी स्थिती निर्माण झाल्याचे कामाठीपुऱ्यातील दुचाकीस्वाराने जीव गमावल्याने स्पष्ट झाले आहे. या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षे उलटली तरी रस्ता पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कामाठीपुऱ्याजवळची स्थिती; अर्धवट कामामुळे जाताहेत जीव 

सातारा - पोवई नाक्‍यावरून गोडोलीकडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकाला चुकीच्या ठिकाणी ‘यू टर्न’साठी जागा सोडल्यामुळे जीवघेणी स्थिती निर्माण झाल्याचे कामाठीपुऱ्यातील दुचाकीस्वाराने जीव गमावल्याने स्पष्ट झाले आहे. या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षे उलटली तरी रस्ता पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

मोळाचा ओढा ते पोवई नाकामार्गे गोडोली या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाशी अशास्त्रीय पद्धतीने दुभाजकांमध्ये ‘यू टर्न’साठी जागा सोडण्यात आली आहे. गोडोलीत, सायन्य कॉलेज संपल्यानंतरच्या ओढ्यावरील उतारावर गेल्या बुधवारी सायंकाळी कामाठीपुरा येथील दुचाकीस्वाराचा दुभाजक ओलांडत असताना अपघात झाला. त्यात ज्योतीराम विठ्ठल साळुंखे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. ते कामाठीपुऱ्यातून येऊन दुभाजकामध्ये ठेवलेल्या जागेतून रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी पोवई नाक्‍याकडून गोडोलीकडे निघालेल्या मोटारसायकलने (एमएच ११ बीएस १६८५) त्यांना धडक दिली. दुसऱ्या मोटारसायलकवरील युवक फलटणचा रहिवासी असून, त्याच्याही डोक्‍यास जबर मार लागल्याचे समजते. त्याला अधिक उपचारार्थ पुण्यास हलविण्यात आले आहे. 

मोळाचा ओढा ते गोडोली या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने अनावश्‍यक ठिकाणी दुभाजकामध्ये रस्ता ओलांडण्यास जागा सोडली आहे. हे ‘यू टर्न’ शास्त्रीय असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गोडोलीत अपघातग्रस्त ठिकाणी साई मंदिराकडून येणाऱ्या लेनमध्ये चढ असल्याने खालूनच वाहने वेग घेऊन येतात, तर विरुद्ध बाजूस सायन्स कॉलेजकडून ओढ्यापर्यंत तीव्र उतार आहे. त्यामुळे पोवई नाक्‍याकडून येणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असतो. अशावेळी दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकास वरून किंवा खालून येणाऱ्या वाहनाच्या वेगाचा अंदाज येत नाही. 

या रस्त्यावर दोन वर्षांपासून पथदिवे नसल्याने पारसनीस कॉलनीपासून महावितरण कार्यालयापर्यंत रात्री अंधार असतो. या अंधारात रस्ता ओलांडणारे वाहन, पादचारी सहज दृष्टीस पडत नाही. रस्त्याच्या कामात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. कॉलेज परिसरात दुकानदारांनी वैयक्तिक फायद्यासाठी दुभाजक फोडले आहेत. पादचारी याच ठिकाणाहून रस्ता ओलांडण्याची कसरत करतात. ओव्हर टेक करणाऱ्या वाहनास अचानक रस्त्यात आलेला पादचारी दिसत नाही. चुकीच्या ‘यु टर्न’चा ज्योतिराम साळुंखे बळी ठरले आहेत. कामाठीपुऱ्यातील काही नागरिकांनी कळक टाकून हा ‘यू टर्न’ बंद केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ता ओलांडण्याचा हा मार्ग बंद करावा, अशी मागणी गोडोलीतील नागरिकांनी केली आहे. 

एखादा मृत्यूदायक अपघात घडल्यास कोणाची चूक आहे हे लक्षात न घेता दुसऱ्या वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. याच न्यायाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. प्रसंगी गोडोलीतील नागरिकांसह रस्त्यावर उतरणार.
- सुशांत मोरे, अध्यक्ष, दिशा विकास मंच

Web Title: satara news dangerous u turn in godoli